Breaking News

अमेरिकेबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर – रशियाची बॉम्बर्स विमाने व्हेनेझुएलात दाखल

मॉस्को/वॉशिंग्टन – सिरियातील संघर्ष, युक्रेनचा वाद आणि नॉर्डस्ट्रिम गॅसपाईपलाईन यामुळे अमेरिका व रशियातील तणाव वाढत असताना रशियाची दोन बॉम्बर्स विमाने व्हेनेझुएलामध्ये दाखल झाली आहे. या बाम्बर्स विमानांच्या तैनातीसह व्हेनेझुएलाच्या सुरक्षेसाठी आपण तयारी करीत असल्याचा दावा रशियाने केला. तर रशियन बॉम्बर्स व्हेनेझुएलात दाखल होत असताना अमेरिकेच्या हवाईदलाने नेवाडामध्ये शत्रूच्या भूभागात सैन्य उतरविण्याचा सराव केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. अर्जेंटिना येथील ‘जी-२०’च्या बैठकीत ही चर्चा अपेक्षित होती. पण त्याआधी रशियाने ‘सी ऑफ अ‍ॅझोव्ह’मध्ये युक्रेनची जहाजे ताब्यात घेतली होती. रशियाच्या या कारवाईवर टीका करून ट्रम्प यांनी पुतिन यांची भेट घेण्याचे नाकारले होते. सिरिया, युक्रेनमधील रशियाच्या या आक्रमक हालचालींवर अमेरिकेकडून टीका होत असताना सोमवारी रशियन वायुसेनेची विमाने व्हेनेझुएलाच्या ‘बोलिव्हर’ विमानतळावर दाखल झाली.

रशियाची दोन सुपरसोनिक ‘टू-१६०’ बॉम्बर विमाने तसेच रशियन लष्कराचे ‘अ‍ॅन-१२४’ आणि ‘आयएल-६२’ ही अवजड वाहतूक विमाने देखील व्हेनेझुएलात दाखल झाली. रशियन बॉम्बर्सनी नॉर्वेचा समुद्र, अटलांटिक महासागर व कॅरेबियन समुद्र असा दहा हजार किलोमीटरहून अधिक लांबीचा प्रवास केला. व्हेनेझुएलाच्या वायुसेनेबरोबर हवाईसरावात सहभागी होण्यासाठी रशियन विमाने दाखल झाल्याचे रशियाने सांगितले. पण या हवाईसरावाद्वारे व्हेनेझुएलाला सुरक्षेबाबत आश्‍वस्त करण्यासाठी रशियन विमाने येथे दाखल झाल्याचे संरक्षणमंत्री व्लादिमिर लोपेझ म्हणाले.

रशियन बॉम्बर्स विमानांच्या व्हेनेझुएलातील तैनातीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी आक्षेप घेतला आहे. ‘या हवाईसरावाद्वारे दोन भ्रष्टाचारी देश आपल्या जनतेचा पैसा उडवित आणि आपल्याच जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत’, अशी टीका पॉम्पिओ यांनी केली. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी अमेरिकेचा हा आरोप फेटाळला.

दरम्यान, अमेरिकेच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर थ्री’ आणि ‘सी-१३० हर्क्युलिस’ या लष्करी विमानांच्या ताफ्याने नेवाडा प्रांतात मोठा युद्धसराव केला. ‘जॉईंट फोर्सिबल एन्ट्री’ असे या युद्धसरावाचे नाव असून यामध्ये किमान दहा विमाने सहभागी झाली होती. युद्धकाळात सैनिकांना शत्रूच्या भूभागात उतरविणे व त्यापुढील लष्करी कारवाईचा सराव यावेळी करण्यात आला. हा वार्षिक सराव असल्याचा दावा अमेरिका करीत आहे. पण रशियाची बॉम्बर्स विमाने व्हेनेझुएलामध्ये दाखल होत असताना अमेरिकेच्या विमानांचा हा सराव वेगळेच संकेत देणारा ठरत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info