Breaking News

चीनकडून इस्लामच्या ‘चिनीकरणा’चा कायदा मंजूर – चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ची माहिती

बीजिंग – झिंजिआंग प्रांतातील सुमारे ११ लाख इस्लामधर्मियांना नजरकैदेत ठेवणार्‍या चीनच्या राजवटीने इस्लाममध्ये आपल्या साम्यवादी धोरणाला अनुकूल बदल करण्याचा कायदा मंजूर केला. हे ‘इस्लामचे सिनिसायझेशन’ म्हणजे इस्लामचे चिनीकरण असल्याचे सांगून चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने याची माहिती दिली. चीनचे नेतृत्व आणि राजकीय भूमिकेशी इस्लामधर्मियांनी एकनिष्ठ राहण्याची शर्त या कायद्यामध्ये असल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे अधिकारी आणि आठ प्रांतातील इस्लामी संघटनांच्या पदाधिकार्‍यांमध्ये विशेष बैठक पार पडली. यामध्ये चीनची राजधानी बीजिंगसह, शांघाय, हुनान, यूनान आणि किंगहाई या प्रांतातील इस्लामधर्मिय नेत्यांचा समावेश होता, अशी माहिती चीनच्या मुखपत्राने दिली. इस्लाममध्ये चीनच्या राजवटीचा अर्थात साम्यवादी मुल्यांचा समावेश करण्याच्या प्राथमिक धोरणावर या बैठकीत एकमत झाल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटले आहे.

२०१८ ते २०२२ या पाच वर्षांत या कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती सदर चिनी मुखपत्राने दिली. तीन वर्षांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी इस्लामधर्मामध्ये चीनला अपेक्षित असलेल्या बदलांबाबतची योजना मांडली होती, अशी माहिती बीजिंगस्थित एका इस्लामधर्मिय संघटनेच्या वरिष्ठ नेत्याने दिली.

तसे करीत करताना इस्लामच्या मुलभूत तत्त्वज्ञानात अथवा त्यावरील विश्‍वासात बदल होणार नसल्याचा दावा हे नेते करीत आहेत. मात्र चीनमधील कम्युनिस्ट राजवटीला अनुकूल ठरेल, असे बदल चीनमधील इस्लामधर्मियांसाठी करण्यात येतील, असा खुलासा ‘चायना इस्लामिक इन्स्टिट्यूट’चे उपाध्यक्ष गाओ झांफू यांनी केला. यासंबंधीची पुस्तके लवकरच चीनच्या सरकारकडून प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती गाओ यांनी दिली.

दरम्यान, चीनमध्ये सुमारे दोन कोटी इस्लामधर्मिय आहेत. चीनच्या राजवटीने कम्युनिस्ट विचारधारेचा पुरस्कार करून धार्मिक स्वातंत्र्य नाकारणार्‍या इस्लामधर्मियांची गळचेपी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार काही महिन्यांपूर्वी चीनच्या राजवटीने झिंजियांग प्रांतातील सुमारे ११ लाख उघूरवंशिय इस्लामधर्मियांना कट्टरवादविरोधी मोहिमेच्या अंतर्गत वेगवेगळ्या शिबिरांमध्ये डांबल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर चीनमधील हुईवंशिय इस्लामधर्मियांवरील अत्याचारांच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून झिंजिआंगमध्ये उघडपणे मानवाधिकारांचे उल्लंघन सुरू असल्याचा आरोप करून चीनच्या राजवटीवर निर्बंध लादण्याची मागणी अमेरिकेत करण्यात येत आहे.

याला काही आठवडे उलटत नाही तोच, चीन आपल्याला अनुकूल ते बदल करून आपल्या देशातील इस्लामधर्मियांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचे दिसत आहे.

  English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info