Breaking News

व्हेनेझुएलाच्या मुद्यावरून पाश्‍चात्य देश व रशियामध्ये तणाव – मदुरो यांच्याकडून ‘सिव्हील वॉर’ची धमकी

कॅराकस/वॉशिंग्टन/ब्रुसेल्स – व्हेनेझुएलामध्ये एकाच वेळी दोन राष्ट्राध्यक्षांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. सध्या व्हेनेझुएलाची सत्ता हातात असलेले राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना मान्यता नाकारून त्यांच्या विरोधात खडे ठाकलेल्या ‘जुआन गैदो’ यांना अमेरिकेने पाठिंबा दिला होता. अमेरिकेच्या पाठोपाठ ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी, ऑस्ट्रिया व स्पेन या युरोपिय देशांनीही ‘गैदो’ हेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष असल्याचे घोषित केले. यामुळे व्हेनेझुएलातील सत्तासंघर्षाचा नवा भडका उडणार असल्याचे दिसत आहे.

मदुरो, सिव्हील वॉर ची धमकी, निकोलस मदुरो, व्हेनेझुएला, करार, ww3, रशिया, US, जर्मनीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मदुरो यांची राजवट उलथण्यासाठी व्हेनेझुएलात लष्कर घुसविण्याचा पर्याय समोर असल्याचे जाहीर केले होते. पण अमेरिकेने असे प्रयत्न केलेच तर ‘व्हाईट हाऊस’देखील रक्ताने माखून निघेल, अशी धमकी मदुरो यांनी दिली. यानंतर मदुरो यांच्या विरोधातील अमेरिका व मित्रदेशांची आघाडी अधिकच आक्रमक बनली आहे. ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी, ऑस्ट्रिया व स्पेन या देशांनी ‘गैदो’ यांना व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता घोषित केली. या युरोपिय देशांच्या निर्णयावर रशियाने सडकून टीका केली आहे. युरोपिय देश संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलाला सहाय्य करण्याचे सोडून या देशात हस्तक्षेप करीत आहेत, असे ताशेरे रशियाने ओढले आहेत.

अमेरिका व मित्रदेशांनी मदुरो यांची राजवट बेकायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. पण रशिया, चीन, तुर्की, इराण व लॅटिन अमेरिकेतील क्युबा व मेक्सिको या देशांकडून असलेल्या समर्थनाच्या जोरावर मदुरो यांनी व्हेनेझुएलाच्या सत्तेवर कायम राहण्याचा हटवादीपणा कायम ठेवल्याचे दिसत आहे.

मदुरो, सिव्हील वॉर ची धमकी, निकोलस मदुरो, व्हेनेझुएला, करार, ww3, रशिया, US, जर्मनीआंतरराष्ट्रीय पातळीवर या घडामोडी सुरू असतानाच अंतरिम राष्ट्राध्यक्ष जुआन गैदो यांनी व्हेनेझुएलाच्या जनतेला सहाय्य करण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय आघाडी उभी करीत असल्याचे जाहीर केले आहे.

तर निकोलस मदुरो यांनी अमेरिका व युरोपवर टीका करताना व्हेनेझुएलात गृहयुद्ध भडकण्याची धमकी दिली आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलात लष्करी कारवाईचा निर्णय घेतलाच तर व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना ते रक्ताने माखलेले असतील, असा इशारा देऊन आपण कुठल्याही परिस्थितीत या देशाची सत्ता सोडणार नाही, असे मदुरो यांनी आणखी एकवार ठासून सांगितले.

मदुरो यांच्यामागे रशियाने लष्करी पाठबळ उभे केल्याने त्यांचा आत्मविश्‍वास दुणावल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने मदुरो यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी सुमारे ४०० पॅरा कमांडो तैनात केल्याचे वृत्त होते. तसेच रशिया मदुरो यांच्याबरोबर इतर काही करार करून त्याचे व्यापारी लाभ घेत असल्याचेही या निमित्ताने समोर येत आहे.

रशियाचे आर्थिक हितसंबंध आता व्हेनेझुएलामध्ये गुंतल्यानंतर, मदुरो यांची पकड अधिकच वाढल्याचे बोलले जाते. मात्र, सध्या उपासमार होत असलेल्या व्हेनेझुएलाच्या जनतेला भेडसावणार्‍या समस्या दूर करण्यासाठी मदुरो कोणते पाऊल उचलतात, यावर त्यांच्या राजवटीचे भवितव्य अवलंबून आहे, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info