Breaking News

भारतीय नौदलाच्या तैनातीचा पाकिस्तानला थांगपत्ता नाही – नौदलाचे पाकिस्तानच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर

नवी दिल्ली/इस्लामाबाद – भारताची पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत शिरण्याच्या तयारीत होती. पण पाकिस्तानी नौदलाला वेळीच तिचा सुगावा लागला आणि या पाणबुडीला रोखण्यात आले. खरेतर या पाणबुडीवर हल्ला चढविणे सोपे होते. पण आम्ही संयम दाखविला, असा दावा पाकिस्तानच्या नौदलाने केला. मात्र भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या नौदलाच्या ‘संयमाची’ हवा काढून घेतली. भारतीय नौदलाने तैनाती केली आहेच, पण ती कुठे आहे, याचा थांगपत्ता पाकिस्तानला लागलेला नाही, असे सांगून भारताच्या नौदलाने पाकिस्तानवरील दडपण अधिकच वाढविले. त्याचवेळी भारताच्या नौदलप्रमुखांनी सागरी मार्गाने देशावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे सांगून यासाठी नौदल सज्ज असल्याची ग्वाही दिली.

मंगळवारी सकाळच्या सुमारास पाकिस्तानी नौदलाने आपली प्रचारमोहीम सुरू केली. भारताची पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत शिरू पाहत होती. पण वेळीच ही पाणबुडी हुडकून काढण्यात आपल्याला यश मिळाल्याचा दावा पाकिस्तानच्या नौदलाने केला. ही पाणबुडी टिपणे शक्य असूनही पाकिस्तानी नौदलाने संयम दाखविला व अखेरपर्यंत भारतीय पाणबुडीचा पाठलाग केला, अशी फुशारकी पाकिस्तानच्या नौदलाने मारली. तसेच पाकिस्तानी नौदलाने यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओ फुटेजवर ४ मार्च रोजी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडल्याची नोंद करण्यात आली होती.

पण हा पाकिस्तानच्या प्रचारमोहिमेचाच भाग होता, हे काही तासातच स्पष्ट झाले. सदर व्हिडिओ २०१६ सालच्या नोव्हेंबर महिन्यातील असल्याचे स्पष्ट झाले. या व्हिडिओवरील तारिख आणि वेळ बदलली व त्याचा आपल्या प्रचारमोहिमेसाठी वापर केल्याचे उघड झाले. भारतीय नौदलाने पाकिस्तानचे पितळ उघडे करणारे निवेदन प्रसिद्ध केले. पाकिस्तान खोटारडा प्रचार करीत दिशाभूल करणारी माहिती देत आहे. भारतीय नौदल याला बळी पडणार नाही. भारतीय नौदलाच्या तैनातीचा थांगपत्ताही पाकिस्तानला लागलेला नाही. यापुढेही भारतीय नौदलाची तैनाती तशीच राहिल, असे या निवेदनात बजावण्यात आले आहे.
दरम्यान, नवी दिल्ली येथे ‘इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग’ या परिषदेत बोलताना भारताच्या नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लान्बा यांनी भारतात घातपात माजविण्यासाठी दहशतवादी तयार केले जात असून यासाठी सागरी मार्गाचा अवलंब करण्यात येणार असल्याचे बजावले. मात्र भारतीय नौदल यासाठी सज्ज असल्याची ग्वाही देखील नौदलप्रमुखांनी दिली.

याआधी भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी संघटना व त्यांच्या मागे उभ्या असलेल्या पाकिस्तानच्या ‘आयएसआय’कडून दहशतवाद्यांना सागरी दहशतीसाठी प्रशिक्षण दिले जात असल्याचा इशारा दिला होता. भारत पाकिस्तानवर कठोर कारवाईची तयारी करीत असताना, भारताला दहशतवादी धक्का देण्याचा कुटील डाव पाकिस्तानकडून आखला जाऊ शकतो. याचीच पूर्वसूचना नौदलप्रमुखांकडून दिली जात आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info