Breaking News

देशात निवडणुका असल्या तरी इस्रायल दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देईल – इस्रायली पंतप्रधानांचा हमासला इशारा

जेरूसलेम – ‘इस्रायलमध्ये निवडणूक आहे, म्हणून इस्रायलच्या सीमाभागात कितीही हल्ले केले तरी इस्रायलचे सरकार आणि लष्कर आपल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार नाही, अशा भ्रामात हमासने राहू नये. दहशतवादी हल्ले चढवून इस्रायलला आव्हान दिले तर गाझापट्टीवर सर्वात मोठी कारवाई केली जाईल’, असा सज्जड इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला.

सलग चार दिवस गाझापट्टीतून हमासचे दहशतवादी व समर्थक यांच्याकडून इस्रायलच्या सीमाभागात रॉकेट्स, मॉर्टर्स तसेच बलून बॉम्बचे हल्ले चढविले जात आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी तसेच लष्कराने या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. पण यानंतरही हमासच्या हल्ल्यांमध्ये फरक पडलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर, रविवारी साप्ताहिक कॅबिनेट बैठकीनंतर पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी माध्यमांशी बोलताना हमासचे हल्ले थांबविण्यासाठी तसेच इस्रायलच्या सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्रायल गाझापट्टीवर मोठी लष्करी कारवाई करू शकतो, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी बजावले.

९ एप्रिल रोजी इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणूका पार पडणार आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या जनमत सर्वेक्षणात पंतप्रधान नेत्यान्याहू यांना मोठे समर्थन असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधान नेत्यान्याहू यांना इस्रायलच्या सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर इस्रायलवर हल्ले सुरू ठेवले पाहिजे, अशी घोषणा लेबेनॉनमधील इराणसमर्थक हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्ला म्हणाला होता. तसेच इस्रायलवर एकाचवेळी लेबेनॉन, सिरिया, गाझापट्टीतून हल्ले चढविण्याचे आवाहन नसरल्लाने केले होते.

या पार्श्‍वभूमीवर, गेल्या काही दिवसांपासून गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली होती. हमासच्या या हल्ल्यांना इस्रायली लष्कराने प्रत्युत्तर दिले. पण यानंतरही हमासकडून इस्रायलच्या सीमाभागात हल्ले सुरू असून पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी गाझातील हमास तसेच इस्लामिक जिहाद या दोन्ही संघटनांना धमकावले.

‘इस्रायलमधील निवडणुकांची काळजी हमासने करू नये. गाझापट्टीतील कुठल्याही संघटनेकडून इस्रायलवर हल्ला झाला तर या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल’, असा इशारा नेत्यान्याहू यांनी दिला. या इशार्‍यामुळे इस्रायली पंतप्रधान हमास तसेच इतर दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

English   हिंदी

Click below to express your thoughts and views on this news:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info