Breaking News

भारताच्या हल्ल्याच्या भीतीने – पाकिस्तानी हवाई दलाच्या हालचालींमध्ये वाढ

इस्लामाबाद – आपल्या लढाऊ विमानांचे महामार्गांवरून उड्डाण करून पाकिस्तानने संरक्षणसिद्धतेची चाचणी केली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने याची घोषणा केली असून याचे व्हिडिओज् प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानात चीनची लढाऊ विमाने दाखल झाल्याचे वृत्त आहे. लवकरच ‘पाकिस्तान डे’ साजरा केला जाणार असून यासाठी चीनची लढाऊ विमाने पाकिस्तानात दाखल झाल्याचे सांगितले जाते. तसेच पाकिस्तानने भारताच्या हवाई हल्ल्याच्या भीतीने आपली हवाई हद्द अजूनही पूर्णपणे कार्यान्वित केलेली नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानी यंत्रणांनी म्हटले आहे.

गेल्या २० दिवसांपासून भारतालगतची आपली हवाई हद्द पाकिस्तानने बंद ठेवली आहे. यामुळे पाकिस्तानचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून आधीच कंगाल बनलेल्या पाकिस्तानच्या तिजोरीवर यामुळे नवा भार पडत आहे. तरीही राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी दिली. अजूनही भारताने पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे, त्यामुळे हवाई हद्द मोकळी करण्याचा निर्णय घेणे शक्य नाही, असे पाकिस्तानच्या अधिकार्‍यांचे म्हणणे असल्याचा दावा माध्यमे करीत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गाने आपली युद्धसज्जता प्रदर्शित करीत आहे. सोमवारी पाकिस्तानच्या हवाई दलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यात एका अज्ञात ठिकाणच्या हायवेवरून पाकिस्तानची विमाने उड्डाण करीत असल्याचे तसेच हायवेवर लँड केली जात असल्याचे दाखविण्यात आले. हा सराव सुरू असताना पाकिस्तानच्या हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी त्याची पाहणी करीत होते. अशारितीने महामार्गांचा वापर लढाऊ विमानांसाठी करण्याची वेळ युद्धजन्य परिस्थितीतच उद्भवू शकते. त्यामुळे पाकिस्तान याद्वारे आपली क्षमता दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानच्या माध्यमांनी ही बाब उचलून धरली आहे.

दरम्यान, पाकिस्तानची लढाऊ विमाने अशा स्वरुपाचा सराव करीत असताना, चीनची लढाऊ विमाने पाकिस्तानात दाखल झाली आहेत. २३ मार्च रोजी पाकिस्तानात ‘नॅशनल डे’ साजरा केला जाईल. त्यासाठी चीनची ही विमाने आल्याचा दावा केला जातो. तसेच तुर्कीने आपल्या ताफ्यातील लढाऊ विमाने यासाठी पाकिस्तानात रवाना केली आहेत. याचाही वापर करून पाकिस्तान भारतावर दबाव वाढविण्यासाठी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र पाकिस्तानची ही सारी धडपड भारताचा हल्ला टाळण्यासाठीच सुरू असून यामागे असुरक्षितता असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

पाकिस्तान मोठ्या प्रमाणात लष्करावर खर्च करीत असून त्याऐवजी या देशाने आपल्या मनुष्यबळ विकासासाठी गुंतवणूक करावी, असा सल्ला जागतिक बँकेने दिला आहे. सोमवारीच ही बातमी प्रसिद्ध झाली. पाकिस्तानचा सुमारे ७० टक्के इतका खर्च संरक्षणावरच होत असून यामुळे पाकिस्तानची प्रगती खुंटल्याचा अहवाल जागतिक बँकेने दिला आहे. असे असूनही युद्धखोरीमुळे दिवाळे निघण्याच्या स्थितीत असतानाही पाकिस्तान भारताला धडा शिकविण्याची भाषा सोडून द्यायला तयार नाही. मुख्य म्हणजे मसूद अझहर सारख्या दहशतवाद्याचा बचाव करून पाकिस्तान आपल्या पायावर धोंडा मारून घेत असल्याची टीका याच देशाचे विश्‍लेषक करू लागले आहेत. म्हणूनच यापुढे पाकिस्तान व चीनने अझहरवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखू नये, अशी मागणी पाकिस्तानच्या जबाबदार माध्यमगटांकडून केली जात आहे. तर कट्टरपंथीयांचा गट मात्र भारत व आंतरराष्ट्रीय समुदायाचे ऐकून पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करता कामा नये, असा इशारा देत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांवरील कारवाईवरून पाकिस्तानात गंभीर मतभेद निर्माण झाले असून पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्षनेतेही सरकारकडे दहशतवाद्यांवर कारवाईची मागणी करीत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info