‘साऊथ चायना सी’च्या वादावरुन चीन-अमेरिकेत महायुद्ध भडकेल – फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

‘साऊथ चायना सी’च्या वादावरुन चीन-अमेरिकेत महायुद्ध भडकेल – फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा

मनिला – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात चीन आणि फिलिपाईन्समध्ये ‘पाग-असा’ बेटांवरुन निर्माण झालेला वाद अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत, ‘स्कारबोरो द्वीपसमुहांच्या वादावरुन चीनने फिलिपाईन्सवर हल्ला चढविला तर अमेरिका आमच्या मदतीला धाव घेईल. असे झाले तर महायुद्धाचा भडका उडेल’, असा इशारा फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी दिला.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी ‘पाग-असा’ बेटाला वेढा घालणार्‍या चीनच्या शेकडो जहाजांवर तीव्र आक्षेप घेतला होता. चीनच्या जहाजांनी ‘पाग-असा’ बेटांबाबत छोटी चूक केली तर आपल्या एका इशार्‍यावर फिलिपाईन्सचे लष्कर चीनच्या जहाजांवर आत्मघाती हल्ले चढविल, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी धमकावले होते. गेल्या तीन वर्षात चीनबरोबर व्यापारी सहकार्य वाढविण्याची भूमिका घेणार्‍या राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी चीनला दिलेल्या या इशार्‍यावर आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते.

फिलिपाईन्समधील एका वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी ‘साऊथ चायना सी’तील तणावावर आपली भूमिका मांडली. काही वर्षांपूर्वी ‘स्कारबोरो शोल’मधील द्वीपसमुहावरील फिलिपिनो मच्छिमारांच्या सुरक्षेला चीनकडून धोका निर्माण झाला होता. त्यावेळी अमेरिकेच्या तत्कालिन राष्ट्राध्यक्षांनी फिलिपाईन्सची बाजू घेण्याचे टाळले होते. पण आत्ता चीनने फिलिपाईन्सच्या सुरक्षेला आव्हान दिले तर अमेरिका या सागरी क्षेत्राच्या वादात उडी घेईल. असे झाले तर चीन व अमेरिकेत महायुद्धाचा भडका उडेल, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते म्हणाले.

त्याचबरोबर या दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकले तर अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्बचा वापर होईल आणि जगात काहीच उरणार नाही. आपण सगळेच नष्ट होऊ, असा दावा राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी केला. पण चीनबरोबर पुन्हा एकदा चर्चा करून ‘साऊथ चायना सी’चा वाद सोडविण्याची तयारी राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी व्यक्त केली. यासाठी लवकरच आपण चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार असल्याचे संकेत फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिले.

दरम्यान, ‘साऊथ चायना सी’च्या वादावरुन अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध भडकण्याचा इशारा चीनच्या लष्करी अधिकार्‍यांनी याआधीच दिला होता. त्याचबरोबर या सागरी क्षेत्रावर ताबा मिळवायचा असेल तर चीनने अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौकांना जलसमाधी द्यावी, असेही चीनच्या अधिकार्‍यांनी सुचविले होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info