अमेरिकी संसदेला धुडकावून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सौदीसह आखाती देशांना आठ अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करणार

अमेरिकी संसदेला धुडकावून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सौदीसह आखाती देशांना आठ अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करणार

वॉशिंग्टन/रियाध – इराणकडून सातत्याने देण्यात येणार्‍या हल्ल्यांच्या धमक्यांमुळे आखातातील तणाव वाढल्याचा दावा करून अमेरिकेने आपल्या मित्रदेशांना तब्बल आठ अब्ज डॉलर्सच्या शस्त्रपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी संसदेला धुडकावून सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात व जॉर्डन या तीन देशांना तातडीने मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे देण्याचे जाहीर केले. ट्रम्प यांच्या या निर्णयावर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून सदर निर्णय आंतरराष्ट्रीय शांतीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे टीकास्त्र सोडण्यात आले.

इराण व अमेरिकेत निर्माण झालेल्या तणावामुळे ‘आणीबाणी’ची वेळ उद्भवली आहे, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सौदी अरेबियासह तीन आखाती देशांना तातडीने शस्त्रपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाची माहिती दिली. ‘इराणच्या हालचाली आखात तसेच अमेरिकेच्या स्थैर्याला धोका असून त्याने हितसंबंध अडचणीत आले आहेत. हे लक्षात घेऊन इराणच्या द्वेषपूर्ण व घातक कारवाया रोखण्यासाठी आखाती देशांना तातडीने शस्त्रपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, असे पॉम्पिओ यांनी अमेरिकी संसदेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात नमूद केले.

ट्रम्प यांच्या निर्णयानुसार सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात(युएई) व जॉर्डन या देशांना ८.१ अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रे पुरविण्यात येणार आहेत. त्यात ‘पेव्हवे लेझर गायडेड बॉम्ब्स’, ‘प्रिसिजन गायडेड म्युनिशन्स’, ‘एफ-१६’ लढाऊ विमानांची इंजिन्स व ‘जॅव्हेलिन अँटी टँक मिसाईल्स’ यांचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेच्या ज्येष्ठ संसद सदस्यांकडून सौदी अरेबियाबरोबरील सहकार्याच्या मुद्यावर सातत्याने इशारे देण्यात येत होते. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा पत्रकार खशोगी प्रकरणातील सहभाग आणि येमेनमधील संघर्ष या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने सौदीला संरक्षणसहाय्य पुरवू नये, असा इशारा संसद सदस्य तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला होता.

मात्र इराणचा अणुकार्यक्रम व आखातातील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या हालचाली या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी सौदीबरोबरील सहकार्य अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला होता. सौदीला तातडीने शस्त्रपुरवठा व्हावा म्हणून ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न चालविले होते. मात्र संसदेचा विरोध लक्षात घेऊन ट्रम्प यांनी अखेरीस त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर केला व सौदीसह इतर आखाती देशांना शस्त्रास्त्रविक्री करण्यास मान्यता दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अमेरिकेसह इराणमधून तीव्र पडसाद उमटले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info