चीन सार्‍या जगासाठी धोकादायक – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

चीन सार्‍या जगासाठी धोकादायक – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – ‘चीन जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा अत्यंत वेगाने व प्रचंड प्रमाणात आपले संरक्षणसामर्थ्य वाढवित आहे. हे सामर्थ्य वाढविण्यासाठी चीन अमेरिकेकडून कमावलेल्या पैशांचा वापर करीत आहे. असे सामर्थ्य वाढविणारा चीन संपूर्ण जगासाठीच धोकादायक ठरतो आहे’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याबरोबरील पत्रकार परिषदेत चीनबाबत इशारा देतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला अमेरिकेचा पैसा व बौद्धिक संपत्ती लुटू दिली, असा आरोपही केला.
अमेरिका व चीनमध्ये सध्या जबरदस्त व्यापारयुद्ध सुरू असून चीनच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असली तरी चीनने संरक्षणसामर्थ्य वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली असून लष्कराच्या आधुनिकीकरणाचा वेगही वाढविला आहे. २०१९ साली चीनने आपल्या संरक्षणविभागासाठी तब्बल १५२ अब्ज डॉलर्सची तरतूद केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षणखर्चासाठी तब्बल सात टक्के वाढविल्याचे यातून उघड झाले होते.
चीनकडून संरक्षणखर्चासाठी होणारी ही प्रचंड तरतूद व लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी चाललेले प्रयत्न अमेरिकेकडून केलेल्या लुटीच्या बळावर असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला. ‘अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी चीनला दरवर्षी ५०० अब्ज डॉलर्स व त्याहून अधिक पैशाची उघड लूट करू दिली. इतकेच नाही तर याच काळात चीनने अमेरिकेची बौद्धिक संपत्ती व त्यावरील अधिकारही चोरले’, अशा शब्दात ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आधीच्या प्रशासनांना लक्ष्य केले.
आपण लादलेल्या करांनंतर चीनमधील पैसा आता पुन्हा अमेरिकेत येत असल्याचा दावा करून हे रोखण्यासाठीच चीन व्यापारी करार करण्यासाठी धडपडत आहे, असा दावाही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला. चीन अमेरिकेबरोबरील व्यापारातून मिळणारा पैसाच त्यांचे संरक्षणसामर्थ्य वाढविण्यासाठी करीत आहे, त्यामुळे याची गंभीर दखल घ्यायला हवी, असेही ट्रम्प यांनी यावेळी बजावले.
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या संरक्षणविभागाने देशाच्या संसदेला एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालात, चीनच्या लष्करी आणि सुरक्षाविषयक हालचाली वेगाने वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ‘साऊथ चायना सी’मधील कृत्रिम बेटांवर चीनने उभारलेले संरक्षणतळ, आफ्रिकेतील जिबौतीमध्ये उभारलेला तळ, इंडो-पॅसिफिक तसेच आर्क्टिक क्षेत्रात सुरू केलेल्या हालचाली याची जाणीवही अहवालात करून देण्यात आली होती.
त्याचबरोबर चीनकडून घेण्यात आलेली हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी, ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेल गन’ व ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन्स’च्या निर्मितीसाठी वेगाने सुरू केलेले प्रयत्न यावर अमेरिकी संरक्षण विभागाने तीव्र चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या संरक्षणक्षेत्रातील हालचाली व व्यापारयुद्धाचा थेट संबंध जोडून चीनच्या धोक्याकडे पुन्हा लक्ष वेधले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info