Breaking News

ओमानच्या आखातात दोन इंधनवाहू जहाजांवर हल्ला

लंडन/तेहरान – सौदी अरेबिया आणि मित्रदेशांच्या इंधनवाहू जहाजांवरील घातपाती हल्ल्याला महिना उलटत नाही तोच पुन्हा एकदा याच सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या आणखी दोन इंधनवाहू जहाजांवर घातपाती हल्ले झाले. या जहाजांवरील सुमारे ४४ खलाशांना वाचविण्यात यश मिळाले. यानंतर आखाती देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर वाढले आहेत.

इराणच्या किनारपट्टीपासून साधारण २५ मैल अंतरावर या इंधनवाहू जहाजांनी पेट घेतल्याची बातमी इराणी वृत्तवाहिनीने सर्वात आधी प्रसिद्ध केली. यापैकी एक जहाज नॉर्वे तर दुसरे तैवानचे असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही जहाजांवर ‘टॉर्पेडो’चा हल्ला चढविल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते. नॉर्वेच्या इंधनवाहू जहाजाचे मालक ‘फ्रंट अल्टेर’ या कंपनीने ‘टॉर्पेडो’ हल्ल्याचा संशय व्यक्त केला. तर ‘कोकुका करेजस’ या इंधनवाहू कंपनीने घातपाताचा दावा केला. इराणच्या बोटीने जहाजातील ४४ खलाशांची सुखरूप सुटका केल्याचे जाहीर केले असून या घटनेचा तपास केला जाईल, असे म्हटले आहे.

याआधी १२ मे रोजी ‘संयुक्त अरब अमिराती’च्या (युएई) फुजेराह बंदराजवळ तैनात चार इंधनवाहू जहाजांवर हल्ले झाले होते. यात दोन सौदी तर प्रत्येकी एक ‘युएई’ आणि नॉर्वेच्या जहाजांचे नुकसान झाले होते. सदर हल्ल्यामागे इराण असल्याचा आरोप सौदी अरेबिया, युएई व नॉर्वेने केला होता. अमेरिकेने देखील पर्शियन आखातात गस्त घालणार्‍या इराणच्या जहाजांनी हल्ला घडविल्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे गुरुवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

ओमानच्या आखातातील या हल्ल्यानंतर सौदी, युएई व इतर आखाती देशांनी अलर्ट जारी केला आहे. पर्शियन आखातातून आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रासाठी प्रवास करणार्‍या इंधनवाहू तसेच व्यापारी जहाजांना विशेष सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तर बाहरिन येथे तैनात अमेरिकेच्या पाचव्या आरमाराचे कमांडर ‘जोशूआ फ्रे’ यांनी सदर घटनेचा आढावा घेण्यासाठी आपल्या जहाजांना ओमानच्या आखातात रवाना केले आहे.

या हल्ल्याची बातमी पसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात चार टक्क्यांची वाढ झाली. यामुळे निर्माण?झालेल्या अनिश्‍चिततेचा परिणाम होऊन पुढच्या काळात इंधनाचे दर अधिकच वाढू शकतात, असे संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणची इंधननिर्यात घटली आहे. मात्र जर इराणला इंधननिर्यात करता येणार नसेल, तर होर्मुझच्या आखातातून दुसरा कुठलाही देश इंधनाची निर्यात करू शकणार नाही, अशी धमकी इराणने दिली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info