Breaking News

अमेरिकेचा डॉलर हेच खरे आंतरराष्ट्रीय चलन फेसबुकच्या ‘लिब्रा’ व इतर ‘क्रिप्टोकरन्सीज्’वर अविश्‍वास दाखविणार्‍या ट्रम्प यांचा दावा

वॉशिंग्टन – आपण ‘बिटकॉईन’ अथवा इतर कोणत्याही ‘क्रिप्टोकरन्सीज्’ चाहते नसल्याचे सांगून या क्रिप्टोकरन्सीज्द्वारे अंमली पदार्थांचा व्यापार व इतर बेकायदा कारवायांना प्रोत्साहन मिळते, अशी खरमरीत टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्याचवेळी फेसबुककडून सुरू करण्यात येणार्‍या ‘लिब्रा’ चलनालाही विश्‍वासार्हता नसल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या ‘सोशल मीडिया समिट’मध्ये क्रिप्टोकरन्सीज्ना लक्ष्य करणार्‍या ट्रम्प यांनी अमेरिकेसह जगात ‘डॉलर’ हे एकच मजबूत चलन असल्याची ग्वाहीदेखील दिली.

गेल्या काही महिन्यात अमेरिकेसह युरोपात सोशल मीडिया कंपन्यांची एकाधिकारशाही व अनियंत्रित कारभार हा वादाचा मुद्दा ठरला आहे. युरोपिय महासंघाकडून सोशल मीडिया व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर नियंत्रणाचे संकेत देण्यात आले आहेत. फ्रान्सने या कंपन्यांवर ‘डिजिटल टॅक्स’ लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी अमेरिकेतही संसद व इतर आघाडीच्या यंत्रणांकडून सोशल मीडिया व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची चौकशी सुरू झाली आहे.

चलन, क्रिप्टोकरन्सीज्ना लक्ष्य, डिजिटल टॅक्स, लिब्रा, अमेरिकी डॉलर, फेसबुक, टीका, ww3, वॉशिंग्टन, युरोप

गेल्याच महिन्यात जगातील आघाडीची क्रिप्टोकरन्सी असणार्‍या ‘बिटकॉईन’चे दर विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचले आहेत. त्याचवेळी फेसबुकने ‘लिब्रा’ची घोषणा करून माहिती तंत्रज्ञान व वित्त क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या ‘डिजिटल करन्सी’ क्षेत्रात उतरण्यास सुरुवात झाल्याचे संकेत दिले आहेत. ‘ऍमेझॉन’, ‘जे पी मॉर्गन’ यासारख्या कंपन्यांकडूनही डिजिटल करन्सी सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

या पार्श्‍वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये झालेली ‘सोशल मीडिया समिट’ लक्ष वेधून घेणारी ठरते. व्हाईट हाऊसमधील या बैठकीत सोशल मीडिया व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी फेसबुकच्या ‘लिब्रा’सह इतर ‘क्रिप्टोकरन्सीज्’वर केलेली टीका महत्त्वाची मानली जाते.

‘आपण बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीज्चे चाहते नाही. हा काही खरा पैसा नाही. विरळ हवेतून काढल्याप्रमाणे असणार्‍या या करन्सींचे मूल्य अत्यंत अस्थिर आहे. कोणतेही नियंत्रण नसणार्‍या क्रिप्टोकरन्सीज् गुन्हेगारी प्रवृत्तींसह अवैध, बेकायदेशीर कारवायांना बळ देणार्‍या असून त्यांचा वापर अंमली पदार्थांच्या व्यापारासाठीही होत आहे’, अशा शब्दात ट्रम्प यांनी क्रिप्टोकरन्सींना लक्ष्य केले.  

‘फेसबुक लिब्रा हे आभासी चलन आहे, त्याला कोणतीही विश्‍वासार्हता किंवा पाया नाही. जर फेसबुक व इतर कंपन्यांना बँक सुरू करायची असेल तर त्यांनी बँकिंग क्षेत्राबाबत नवी सनद तयार करावी. इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँका ज्याप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील नियमांना बांधील आहेत, त्याच धर्तीवर फेसबुकनेही हाच मार्ग अनुसरावा’, असे सांगून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी फेसबुकच्या प्रयत्नांबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

फेसबुक व क्रिप्टोकरन्सीला लक्ष्य करताना ट्रम्प यांनी अमेरिकी डॉलरची प्रशंसा करीत हेच खरे चलन असल्याची स्पष्ट ग्वाहीदेखील दिली. ‘अमेरिकेत फक्त एकच खरे चलन आहे. हे चलन पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले असून भरवशाचे व विश्‍वसनीय आहे. जगातील कोणत्याही भागात हे चलन सर्वात प्रभावी चलन मानले जाते आणि यापुढेही कायम राहिल. या चलनाला अमेरिकी डॉलर म्हणतात’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी डॉलरवरील दृढ विश्‍वास व्यक्त केला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info