हाँगकाँगमध्ये १७ लाख निदर्शक रस्त्यावर – २५ टक्के जनता चीनविरोधी आंदोलनात उतरली

हाँगकाँगमध्ये १७ लाख निदर्शक रस्त्यावर – २५ टक्के जनता चीनविरोधी आंदोलनात उतरली

हाँगकाँग – ‘स्टँड विथ हाँगकाँग’, ‘फाईट फॉर फ्रीडम’ अशा घोषणांच्या निनादात हाँगकाँगमधील १७ लाख निदर्शकांनी आपण चीनच्या धमक्यांपुढे झुकणार नसल्याचा संदेश दिला. चीनच्या निर्दय कम्युनिस्ट राजवटीच्या धमक्या, शेन्झेनमधील लष्करी तैनाती, पोलिसी कारवाई व माध्यमांकडून टाकण्यात येणारी गरळ यांचा हाँगकाँगमधील आंदोलनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रविवारच्या प्रचंड निदर्शनांनी सिद्ध केले. हाँगकाँगवरील चीनच्या अधिपत्यालाच या निदर्शनांमुळे जबर हादरा बसला आहे.

निदर्शक, आंदोलन, कम्युनिस्ट राजवट, शेन्झेन, पोलिसी कारवाई, चीन, हाँगकाँग, अमेरिकागेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ हाँगकाँगमध्ये चीनविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची सुरुवात हाँगकाँगमधील चीनधर्जिण्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात झाली असली तरी आता त्याला अधिक व्यापक स्वरुप आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागले आहे. या समर्थनाचे भांडवल करून चीनची कम्युनिस्ट राजवट हाँगकाँगमधील निदर्शनांमागे परकीय शक्ती असल्याचा आरोप सातत्याने करीत आहे. चीनच्या माध्यमांनी तसेच परराष्ट्र विभागाने अमेरिकेवर उघड टीका करून त्यांनी हाँगकाँगपासून दूर रहावे, असा सल्लाही दिला आहे.

त्याचवेळी दुसर्‍या बाजूला हाँगकाँगमधील सुरक्षायंत्रणा निदर्शकांवर तुटून पडल्या असून अश्रुधूर व ‘बॅटन’चा सर्रास वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत हाँगकाँगच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास ८०० जणांना अटक करण्यात आली असून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. चीनने हाँगकाँगमधील आपला लष्करी तळ आंदोलकांवर कारवाईसाठी सज्ज असल्याचे इशारे दिले आहेत. त्याचवेळी हाँगकाँगला जोडून असलेल्या ‘शेन्झेन’मध्ये चीनच्या निमलष्करी दलाच्या तुकड्या दाखल झाल्या असून सोशल मीडियावर १० मिनिटात हाँगकाँगमध्ये घुसू, अशा स्वरुपाच्या धमक्याही देण्यात येत आहेत.
चीनच्या राजवटीकडून सातत्याने टाकण्यात येणार्‍या या दडपशाहीला झुगारून हाँगकाँगच्या जनतेने रविवारी आपल्या दृढ निर्धाराचे दर्शन घडविले. हाँगकाँगमधील सुमारे ७० लाख नागरिकांपैकी १७ लाखांहून अधिक जण रविवारच्या अभूतपूर्व मोर्च्यात सहभागी झाले होते. व्हिक्टोरिया पार्कमधील हा मोर्चा म्हणजे शहरातील २५ टक्के जनतेने चीनच्या राजवटीविरोधात ठामपणे उभे राहण्याचा केलेला निश्‍चय असून त्याने चीनच्या सत्ताधार्‍यांना चांगलाच झटका बसला आहे.

दोन महिन्यांहून अधिक काळ सातत्याने चीनच्या पोलादी पंज्याला न घाबरता रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शविण्याचा हाँगकाँगच्या जनतेचा इरादा आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलाच गाजू लागला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, तैवान यासारख्या देशांमधून हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तीव्र चीनविरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हाँगकाँगमधील आंदोलकांनीही आंतरराष्ट्रीय समुदायाला उघडपणे आवाहन करण्यास सुरुवात केली असून जगभरातील प्रमुख माध्यमांमध्ये आंदोलनाची माहिती देणार्‍या जाहिराती प्रसिद्ध केल्याचे समोर आले आहे.

English   मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info