इराणच्या ‘लबैक’ तंत्रज्ञानावर इस्रायलची चिंता

इराणच्या ‘लबैक’ तंत्रज्ञानावर इस्रायलची चिंता

तेल अविव/तेहरान – इराणने विकसित केलेल्या ‘लबैक’ तंत्रज्ञानावर इस्रायलचे लष्करी विश्‍लेषक व साप्ताहिकांनी चिंता व्यक्त केली. इराणने ‘लबैक’ तंत्रज्ञानाचा वापर रॉकेट्समध्ये केला केल्यास रॉकेट्स व क्षेपणास्त्रांच्या तीव्रतेचे हल्ले चढवतील आणि हे इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक असेल. अशा परिस्थितीत इराणने सदर तंत्रज्ञान हिजबुल्लाहला पुरविले तर इस्रायलची दक्षिणेकडील शहरे तसेच अतिसंवेदनशील ठिकाणे दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर येतील, याकडे इस्रायली साप्ताहिकाने लक्ष वेधले.

गेल्या आठवड्यात इराणने ‘लबैक’ तंत्रज्ञानाची स्थानिक माध्यमांमध्ये उघड केली. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या ताफ्यातील ‘फतेह-११०’ या रॉकेट्सच्या चाचणीसाठी लबैकचा वापर करण्यात आला होता. सुमारे ३.५ मॅकच्या वेगाने प्रवास करणारे ‘फतेह-११०’ क्षेपणास्त्र ३०० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. पण इराणच्या ‘फतेह-११०’ची नुकतीच घेण्यात आलेली चाचणी चिंताजनक असल्याचा दावा इस्रायली साप्ताहिकाने केला.

‘फतेह-११०’ रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी इराणने ‘लबैक’ या तंत्रज्ञानाचा केलेला वापर इस्रायली विश्‍लेषकांच्या भुवया उंचाविणारा ठरला आहे. ‘लबैक’ हे रॉकेटला गती देणारे इंजिन असल्याची माहिती इराणने माध्यमांना दिली. पण आखाती तसेच जगभरातील लष्करी हालचालींचे विश्‍लेषण करणार्‍या इस्रायलच्या लष्करी साप्ताहिकाने ‘लबैक’ तंत्रज्ञान याहून अधिक धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

‘लघु पल्ल्याच्या रॉकेट्सचा वेग आणि अचूकता विकसित करणे हे लष्करी संशोधन क्षेत्रात काही नवे नाही. याआधीही वेगवेगळ्या देशांनी आपल्या रॉकेट्सच्या क्षमतेत वाढ केली आहे. पण इराणने फतेह-११० रॉकेटमध्ये लबैक तंत्रज्ञानाचा वापर करून या रॉकेटचे ‘वायुगतिशास्त्र’ (एअरोडायनामिक्स) बदलले आहे’, असा आरोप ‘उझी रुबिन’ या लष्करी विश्‍लेषकाने इस्रायली वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

यामुळे ‘फतेह-११०’ रॉकेट्सची मारक क्षमता वाढली असून या रॉकेटमध्ये क्षेपणास्त्राप्रमाणे मोठ्या प्रमाणात स्फोटके वाहून नेण्याची आणि मोठा विध्वंस घडविण्याची क्षमता विकसित केल्याचा आरोप रुबिन यांनी केला. यामुळे लबैकने सज्ज झालेले ‘फतेह-११०’ रॉकेट देखील क्षेपणास्त्राप्रमाणे दूरवर मारा करू शकते, असा दावा इस्रायली विश्‍लेषक आणि लष्करी साप्ताहिकाने केला.

लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला इराणने सुमारे दीड लाख रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला चढविलाच तर हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ले चढविल, अशी धमकी या संघटनेच्या प्रमुखाने दिली होती. अशा परिस्थितीत इराणने हिजबुल्लाहला लबैक तंत्रज्ञाने पुरविले तर या दहशतवादी संघटनेचे रॉकेट्स देखील इस्रायलवर विध्वंसक हल्ले चढवतील, असा इशारा इस्रायली विश्‍लेषक देत आहेत. लबैकने सज्ज असलेले रॉकेट्स इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेलाही गुंगारा देऊ शकतील, अशी चिंता इस्रायली विश्‍लेषक करीत आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info