Breaking News

सिरियन लष्कर व बंडखोरांचे तुर्कीच्या सैनिकांवर जोरदार हल्ले

दमास्कस – सिरियामध्ये सैन्य घुसवून तुर्कीने सुरू केलेल्या हल्ल्यांमध्ये ५९५ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने केला. तर सिरियन व कुर्दांबरोबरच्या संघर्षात तुर्कीचे १७५ जवान मारल्याची घोषणा कुर्दांनी केली. सिरियन लष्कराने मनबीज तर बंडखोरांनी ‘रास अल-अईन’चा ताबा घेतला. त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तविली जाते.

सिरियन लष्कर आणि कुर्द बंडखोरांमध्ये झालेल्या हातमिळवणीचा पहिला हादरा तुर्कीच्या लष्कराला बसला. सिरियन लष्कर आणि ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ या सिरियन बंडखोरांनी मंगळवारी ‘रास अल-अईन’वर संयुक्त कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी तुर्कीचे लष्कर व तुर्कीसंलग्न सशस्त्र गटाने कुर्द बंडखोरांना पिटाळून या शहराचा ताबा घेतला होता. सिरिया व तुर्कीच्या सीमेवरील या शहराचा ताबा घेतल्यामुळे इंधनवाहू ट्रक्सवरील कुर्दांचे नियंत्रण संपुष्टात आल्याचे बोलले जात होते.

मात्र कुर्दांबरोबर हातमिळवणी केल्यानंतर पुढच्या काही तासातच सिरियन लष्कराने ‘रास अल-अईन’वर पूर्ण नियंत्रण मिळविले. सिरियातील अस्साद राजवटीने यासंबंधी घोषणा केली. पण ‘रास अल-अईन’वर अजूनही आपलेच नियंत्रण असल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आपल्या लष्कराने सिरियाच्या ३० ते ३५ किलोमीटर दूरपर्यंत मुसंडी मारल्याचा दावा तुर्कीने केला.

तसेच सिरियातील कुर्दांचे आणखी एक ठिकाण मनबीजवर सशस्त्र संघटनांनी ताबा घेतल्याची घोषणा तुर्कीने केली. पण कुर्दांनी ताबा दिलेल्या मनबीजमध्ये सिरियन लष्कराने तळ ठोकला आहे. सिरियन लष्कराबरोबरच कुर्द आणि ‘एसडीएफ’चे बंडखोर देखील मनबीजमध्ये तैनात असल्याची माहिती सिरियन लष्कराने दिली.

दरम्यान, सिरियन लष्कर कुर्दांच्या सहाय्यासाठी सीमेजवळ दाखल झाल्यानंतर तुर्कीने देखील सीमेवरील तैनाती वाढविली आहे. तुर्कीचे रणगाडे, तोफा आणि लष्करी वाहने ‘सुरूक’ या सीमाभागात दाखल झाले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info