Breaking News

चीनमधील उघूरवंशियांवर झालेल्या अत्याचाराचे आदेश थेट राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याकडूनच – अमेरिकी दैनिकाचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या हुकुमशाही राजवटीचा भाग असलेल्या यंत्रणांचा वापर करून कोणतीही दयामाया न वापरता उघुरवंशियांची घुसखोरी व इतर कारवायांविरोधात आक्रमक मोहीम राबवा, असे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीच दिल्याचा दावा अमेरिकन दैनिकाने केला. चीनच्या सत्ताधारी राजवटीचा भाग असलेल्या एका सदस्याकडून उघुरांविरोधातील कारवाईबाबतची कागदपत्रे देण्यात आल्याचे सांगून ही बाब उघड करण्यात आली आहे. चीनकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली असून उघुरांविरोधातील कारवाई सुरूच राहील, असे आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने आपल्याच देशाचे नागरिक असलेल्या ११ लाख उघूरवंशियांना नजरकैदेत ठेवल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानंतर चीनमधील उघूरवंशियांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. या अहवालातून, ‘एज्युकेशनल ट्रेनिंग सेंटर’च्या नावाखाली उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्ये चीनने लाखो उघूरवंशिय इस्लामधर्मियांना डांबून ठेवल्याचे उघड झाले होते.

त्यानंतर गेले वर्षभर आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उघुरवंशियांचा मुद्दा उपस्थित होत असून अनेक देशांनी या मुद्यावर चीनला धारेवर धरले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील विविध व्यासपीठांवर चीनची कोंडी होत असल्याचे चित्रही समोर आले आहे. अमेरिकी संसदेने याच मुद्यावर चीनविरोधात कारवाईचीही घोषणा केली असून त्यावर चीनने तीव्र नाराजी दर्शविली होती. राजनैतिक स्तरावर चीनवर टीकेचा भडिमार सुरू असतानाच विविध प्रसारमाध्यमांमधूनही उघुरवंशियांवर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच पाश्‍चिमात्य माध्यमांनी उघूरवंशिय महिलांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागत असल्याचे उघड केले होते. त्यापाठोपाठ आता चीनच्या सत्ताधारी राजवटीचा भाग असलेल्या व्यक्तीकडून उघुरवंशियांविरोधातील मोहिमेची कागदपत्रे खुली होणे लक्ष वेधून घेणारे ठरते. अमेरिकेतील आघाडीचे दैनिक असलेल्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असून जवळपास ४०० कागदपत्रे असल्याची माहिती दिली. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनीच २०१४ साली वेगवेगळ्या बैठकांमध्ये उघुरांविरोधात अधिकाधिक आक्रमक मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिल्याचे यातून उघड झाले आहे.

ही मोहीम राबविताना अमेरिकेने ९/११ दहशतवादी हल्ल्यानंतर ‘वॉर ऑन टेरर’ धोरण राबविताना जी भूमिका घेतली त्याच धर्तीवर उघुरांना लक्ष्य करावे, असा सल्लाही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी दिल्याची माहिती अमेरिकी दैनिकाने दिली. सुरुवातीला आक्रमक मोहीम राबविल्यानंतर चीनच्या काही भागांमधून स्थानिक अधिकार्‍यांनी उघुरांविरोधातील कारवाई करण्यास विरोध सुरू केला होता, अशी माहिती कागदपत्रांमधून उघड होत असल्याचा दावा ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे.
अमेरिकी दैनिकाच्या या वृत्ताविरोधात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. उघुरांविरोधात सुरू असलेली कारवाई सौम्य करणार नाही, असा इशारा यात देण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी, अमेरिकी दैनिकाने झिंजिआंगमधील दहशतवादविरोधी कारवाई व इतर मुद्दे टाळून सोईस्कर माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप केला.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info