Breaking News

इराकमधील निदर्शकांनी इराणचे उच्चायुक्तालय पेटविले – इराकी लष्कराच्या कारवाईत १४ निदर्शकांचा बळी

नजफ – इराकमधील इराणविरोधी वातावरण चांगलेच तापले आहे. ‘इराणींनी इराकमधून चालते व्हावे’, अशा घोषणा देत शेकडो इराकी निदर्शकांनी नसिरिया शहरातील इराणचे उच्चायुक्तालय पेटविले. यानंतर इराकी लष्कराने केलेल्या कारवाईत १४ निदर्शकांचा बळी गेला असून नजफ भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, संतापलेल्या इराणने उच्चायुक्तालयावरील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

इराकची राजधानी बगदाद आणि दक्षिणेकडील भागात इराकी जनतेने मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू ठेवली आहेत. राजधानी बगदादमध्ये इराकी तरुणांनी कडेकोड सुरक्षा असलेल्या ग्रीनझोनला जाणारे रस्ते बंद केले आहेत. तर इराणचा प्रभाव असलेल्या बसरा, नजफ या दक्षिण इराकमध्ये निदर्शकांनी सरकारविरोधी आंदोलन तीव्र केले आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर इराकी निदर्शकांनी नसिरिया शहरातील इराणच्या उच्चायुक्तालयाला घेराव टाकून जाळपोळ करण्यास सुरुवात केली.

या जाळपोळीमध्ये उच्चायुक्तालयातील कर्मचार्‍यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. गेल्या महिन्याभरात इराकच्या दक्षिणेकडील इराणच्या उच्चायुक्तालयावर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो. दोन्ही हल्ल्यांवेळी निदर्शकांनी इराणविरोधात घोषणाबाजी केली. यातून इराकी जनतेमध्ये इराणविरोधात असलेला आक्रोश उघड होत असून निदर्शकांनी धाडसी कारवाई केल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पण इराकमध्ये आपले सैन्य तैनात ठेवणार्‍या इराणकडून इराकी निदर्शकांवर कारवाई अटळ असल्याची चिंता स्थानिकांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांकडे व्यक्त केली.

इराणने आपल्या उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्यावर संताप व्यक्त करून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. ‘इराक सरकार या हल्ल्यांसाठी जबाबदार असणार्‍यांवर निर्णायक, प्रभावी आणि जबाबदारीने कारवाई करील’, अशी अपेक्षा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास मुसावी यांनी व्यक्त केली. इराणमधील इराकच्या दूतावासालाही समन्स बजावल्याचे मुसावी यांनी सांगितले. यानंतर इराकी सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी राजधानी बगदादमध्ये केलेल्या कारवाईत १४ निदर्शकांचा बळी गेला. गेल्या काही दिवसांपासून निदर्शकांनी ताब्यात असलेल्या दोन पुलांवर नियंत्रण मिळविण्यासाठी इराकी सुरक्षा यंत्रणांनी गोळीबार केला. यामध्ये ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, १ ऑक्टोबरपासून इराकमधील सरकारविरोधात सुरू असलेल्या या निदर्शनांमध्ये ३७० जणांचा बळी गेला असून हजारो जखमी झाले आहेत. पंतप्रधान महदी यांचे सरकार इराणच्या हातचे बाहुले असल्याची टीका निदर्शक करीत आहेत. तर अमेरिका व सौदीने ही निदर्शने भडकविल्याचा आरोप इराण करीत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info