‘एआय’मध्ये मानवी जाणीवेत मूलभूत बदल करण्याची क्षमता – अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचा इशारा

‘एआय’मध्ये मानवी जाणीवेत मूलभूत बदल करण्याची क्षमता – अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांचा इशारा

वॉशिंग्टन – रशिया व चीनच्या तुलनेत अमेरिका आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या (एआय)आघाडीवर खूपच मागे पडली आहे, असा इशारा अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी कमिशन’ने दिला आहे. रशिया व चीन हे देश ‘एआय’ तंत्रज्ञानाचा लष्करासाठी वापर करीत आहेत व या क्षेत्रात अमेरिकेला मागे टाकण्याची जोरदार तयारी या देशांनी केली आहे, असे ‘नॅशनल सिक्युरिटी कमिशन’ने बजावले. त्याचवेळी ‘एआय’ तंत्रज्ञानात मानवी जाणिवेमध्ये मुलभूत बदल करण्याची क्षमता असल्याचा इशारा अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी दिला.

‘एआय’च्या लष्करी वापरावर जगभरातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत. मात्र जवळपास सर्वच प्रगत देश ‘एआय’च्या लष्करी वापरावर संशोधन करीत असल्याची बाब वेळोवेळी समोर येत राहिली होती. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये ‘स्ट्रेंथ थ्रू इनोव्हेशन कॉन्फरन्स’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार मानले जाणारे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी ‘एआय’च्या विरोधात इशारा दिला. या तंत्रज्ञानाचा आपण केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करीत नाही, असे किसिंजर यांनी यावेळी स्पष्ट केले. तर ‘एआय’ तंत्रज्ञानाचा ऐतिहासिक, वैचारिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून विचार करतो, असे यावेळी किसिंजर म्हणाले.

हे तंत्रज्ञान मानवी जाणीवेत मूलभूत बदल घडवून आणू शकते, याची आपल्याला खात्री पटली आहे, असे सांगून किसिंजर या तंत्रज्ञानाचा प्रभाव अधोरेखित केला. हे सांगत असताना, आपला ‘एआय’ तंत्रज्ञानाला विरोध नाही, उलट हे तंत्रज्ञान भविष्यात आपल्याला वाचवू शकेल, असा दावा किसिंजर यांनी केला. मात्र या तंत्रज्ञानाच्या लाभाबरोबरच त्याचे विघातक परिणामदेखील समोर येऊ शकतात, याकडे किसिंजर यांनी लक्ष वेधले. मानव संपूर्णपणे ऑटोमॅटिक यंत्रणांनी घेरला जाईल आणि त्यामागचे कारणही धडपणे कळू शकणार नाही, अशा परिस्थितीत काय होईल, याचा आपण विचार करायला हवा, असा प्रश्‍न किसिंजर यांनी केला.

‘एआय’ तंत्रज्ञान धोरणात्मक निर्णय आणि युद्धतंत्रात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. पण हे तंत्रज्ञान विकसित करणार्‍यांना अजूनही याच्या परिणामांची पुरती जाणीव झालेली नाही, ही बाब घातक ठरू शकते, असे सांगून किसिंजर यांनी पुढच्या काळात याचे भयंकर परिणाम समोर येतील, असे म्हटले आहे. मात्र अण्वस्त्र आणि इतर पारंपरिक शस्त्रांस्त्रांप्रमाणे ‘एआय’कडून असलेल्या धोक्याची सरळसोटपणे मांडणी करता येऊ शकत नाही. उलट कुठून धोका संभवतो याची कल्पनाही करता येणार नाही, अशारितीने ‘एआय’मार्फत संभवणार्‍या धोक्यांचा विचार करावा लागेल, असे किसिंजर यांनी म्हटले आहे. म्हणूनच या तंत्रज्ञानावर आवश्यक ते निर्बंध लादण्याची व याच्या विकासावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता किसिंजर यांनी व्यक्त केली.

याआधीही किसिंजर यांनी आर्टिफिशल तंत्रज्ञानाचा अफाट वेगाने होत असलेला विस्तार धोकादायक असल्याचा इशारा दिला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info