Breaking News

इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर हमासकडून इस्रायलला शांतीचर्चेचा नवा प्रस्ताव

गाझा/जेरूसलेम – इराणच्या साथीने इस्रायलवर हल्ले चढविण्याची धमकी देणार्‍या हमासने इस्रायलसमोर शांतीचर्चेचा प्रस्ताव ठेवला. शनिवारी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी केलेल्या कारवाईनंतर हमासने हा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये हमास गाझापट्टीत दीर्घकालिन संघर्षबंदी लागू करून इस्रायलबरोबर कैद्यांच्या हस्तांतरणाबाबत चर्चा करणार असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

    

ठराविक दिवसांच्या विश्रांतीनंतर इस्रायलच्या सीमाभागात रॉकेट हल्ले चढविण्याचे सत्र हमासने सुरू ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमाभागात दोन रॉकेट हल्ले चढविले. पण ‘आयर्न डोम’ यंत्रणेमुळे हे रॉकेट्स इस्रायलच्या हद्दीत प्रवेश करण्याआधीच त्यांना नष्ट करण्यात आले. इस्रायली लष्कराने ही माहिती दिली. या रॉकेट प्रक्षेपणामुळे इस्रायलच्या सीमाभागात भोंगे वाजल्यानंतर सुरक्षित बंकर्समध्ये धाव घेतली.

या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासच्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. यात हमासचे मोठे तळ नष्ट झाल्याचा दावा केला जातो. या व्यतिरिक्त देखील हमासच्या छुप्या ठिकाणांना इस्रायली विमानांनी टार्गेट केले. इस्रायलच्या या हवाई कारवाईनंतर पुढच्या काही तासातच हमासने इस्रायलसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला.

इजिप्तच्या मध्यस्थीनंतर हमास इस्रायलबरोबर शांतीचर्चा करण्यासाठी तयार असल्याचे या संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारी उशीरा स्पष्ट केले. या शांतीचर्चेअंतर्गत गाझापट्टीला शुद्ध पाणीपुरवठा करणे, रुग्णालयांसाठी सहाय्य तसेच कैद्यांच्या सुटकेचा विषय असणार आहे. काही दिवसांपूर्वी हमासने इस्रायलला उद्देशून धमक्या दिल्या होत्या.

यापुढे इस्रायलला गाझापट्टीवर हल्ले चढविण्याची संधी मिळणार नाही, असे भीषण हल्ले इस्रायलवर चढविले जातील, अशी धमकी हमासच्या वरिष्ठ कमांडरने दिली होती. तसेच इस्रायल किंवा अमेरिकेने इराणवर हल्ले चढविले तर इस्रायलला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा हमासच्या नेत्यांनी दिला होता. तसेच हमास आणि इराणमध्ये व्यावहारिक संबंध नसल्याचा दावा हमासच्या नेत्याने केला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हमास व इस्लामिक जिहादने सुरू केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीची सीमारेषा बंद केली होती. याचा फटका इस्रायलमधून गाझासाठी जाणार्‍या व्यापारी वाहतुकीवर झाला होता. यामुळे गाझापट्टीची मोठी कोंडी झाली असून याक्षणी हमास इस्रायलविरोधात मोठा संघर्ष छेडण्याच्या तयारीत नसल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info