‘जॉर्डन व्हॅली’ ताब्यात घेण्यासाठी ऐतिहासिक संधी – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे ट्रम्प यांना आवाहन

‘जॉर्डन व्हॅली’ ताब्यात घेण्यासाठी ऐतिहासिक संधी – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे ट्रम्प यांना आवाहन

जेरूसलेम/वॉशिंग्टन, दि. ५ (वृत्तसंस्था) – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर इस्रायलच्या सुरक्षेच्या मुद्यावर नुकताच संवाद साधला. यात इराणच्या मुद्याबरोबरच नजिकच्या काळात उपलब्ध होणार्‍या काही महत्त्वाच्या संधींबाबतही विस्ताराने बोलणे झाले. इस्रायलची पूर्वेकडील सीमा म्हणून जॉर्डन व्हॅलीवर अधिकार स्थापन करण्याच्या योजनेचाही या चर्चेत समावेश होता’, अशी लक्षवेधी माहिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिली.

   

तीन महिन्यांपूर्वी इस्रायलमधील निवडणूक प्रचारादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी ‘जॉर्डन व्हॅली’बाबत आश्‍वासन दिले होते. ‘‘येत्या निवडणुकीत विजय मिळवून सत्तेवर येताच आपले सरकार वेस्ट बँकमधील ‘जॉर्डन व्हॅली’च्या भूभागावर सार्वभौम अधिकार प्रस्थापित करील’’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली होती. अमेरिका देखील या नव्या भूभागावरील इस्रायलचा सार्वभौम अधिकार मान्य करील, असा दावा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी त्यावेळी केला होता.

गेले काही आठवडे इस्रायलमध्ये सरकार स्थापन करण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर नेत्यान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी फोनवरून साधलेला संवाद लक्ष वेधून घेणारा ठरतो. ट्रम्प यांना केलेल्या फोनसंदर्भात माहिती देताना नेत्यान्याहू यांनी ‘जॉर्डन व्हॅली’चा उल्लेख करून इस्रायलमधील इतर राजकीय गटांना एकजुटीची आठवण करून दिल्याचे मानले जाते.

गेल्या वर्षभरात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इस्रायलविषयक धोरणात फार मोठे बदल घडवून आणले आहेत. जेरूसलेममध्ये अमेरिकेचा दूतावास सुरू करून अमेरिकेने ही इस्रायलची राजधानी असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर १९६७ सालाच्या आधी सिरियाचा ताबा असलेल्या गोलान टेकड्यांवरील इस्रायलच्या अधिकारावर ट्रम्प प्रशासनाने शिक्कामोर्तब केले. त्यापाठोपाठ, पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक येथे इस्रायली नागरिकांसाठी वसविल्या जाणार्‍या वस्त्या कायदेशीर ठरवून ट्रम्प प्रशासनाने इस्रायलला पाठिंबा देणारे मोठे पाऊल उचलले होते.

या पार्श्‍वभूमीवर इस्रायल आता ‘जॉर्डन व्हॅली’वरील अधिकारासाठीही प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. पॅलेस्टाईन सध्या गाझापट्टी व वेस्ट बँक अशा दोन भूभागांमध्ये विभागलेले आहे. गाझापट्टीत हमास तर वेस्ट बँकमध्ये फताह या दोन वेगवेगळ्या पॅलेस्टिनी संघटनांचे प्रशासन आहे. यापैकी वेस्ट बँकमध्ये राष्ट्राध्यक्ष अब्बास यांच्या फताह संघटनेचे प्रशासन असले तरी संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे या भूभागाच्या सुरक्षेची जबाबदारी इस्रायलवर सोपविण्यात आली आहे.

‘जॉर्डन व्हॅली’ आणि ‘डेड सी’ या दोन्ही भागांनी ‘वेस्ट बँक’चा ३० टक्के भूभाग व्यापलेला असून या ठिकाणी ६५ हजार पॅलेस्टिनी तर ११ हजार इस्रायलींचे वास्तव्य आहे.

English  हिंदी  ” ]

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info