Breaking News

इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेची ‘बी-५२’ बॉम्बर्स सज्ज

वॉशिंग्टन – इराण कासेम सुलेमानी यांचा सूड घेण्यासाठी दोन दिवसात अमेरिकेवर हल्ले चढवू शकेल, अशी दाट शक्यता अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी वर्तविली आहे. या हल्ल्यांना तोंड देण्याची तयारी अमेरिकेने केली असून इराणला याच्या भीषण परिणामांचीही जाणीव अमेरिकेकडून करून दिली जात आहे. इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येणार नाही, इतक्या दूर हिंदी महासागरातील ‘दिएगो गार्सिया’ तळावर ‘बी-५२’ बॉम्बर्स विमानांचे पथक तैनात केले आहे. आवश्यकता भासली तर ही ‘बी-५२’ बॉम्बर्स विमाने इराणला सहजपणे लक्ष्य करू शकतात. त्याचवेळी अमेरिकेच्या उताह येथे ‘एफ-३५ए’ या अतिप्रगत लढाऊ विमानांचा ‘एलिफंट वॉक’ करून अमेरिकेने सामर्थ्यप्रदर्शन केले आहे.

इराण अमेरिकेला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेचे लष्करी अधिकारी करीत आहेत. ‘लेफ्टनंट जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येच्या मोबदल्यात आखातातील अमेरिकेच्या लेफ्टनंट जनरल किंवा जनरल पदावरील वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांना इराण लक्ष्य करू शकतो. येत्या ४८ तासात इराणकडून हे हल्ले होऊ शकतात’, अशी माहिती अमेरिकी अधिकार्‍यांनी नाव प्रसिद्ध नकरण्याच्या अटीवर दिली. संयुक्त अरब अमिराती (युएई), कतार, इराक, कुवैतमध्ये तैनात अमेरिकेचे अधिकारी इराणच्या निशाण्यावर असल्याचे सदर अधिकार्‍याचे म्हणणे आहे.

तर इराणने पर्शियन आखातातील गस्तीनौकांची तैनाती व्यापक केली आहे. या गस्तीनौका वेगाने प्रवास करून आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले चढवू शकतात, अशी शक्यता वर्तविली जाते. कुवैतमधील अमेरिकेचे सर्वात मोठे लष्करी तळ आणि बाहरिनच्या सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या आरमारातील युद्धनौकांना या गस्तीनौका लक्ष्य करू शकतात, असा दावा केला जातो.

या व्यतिरिक्त इराक, अफगाणिस्तान, कुवैत, कतार, बाहरिन, सौदी अरेबिया, युएई, जॉर्डन आणि तुर्की या देशांमध्ये अमेरिकेचे एकूण ६६ हजार सैनिक तैनात आहेत. इराणच्या क्षेपणास्त्रांकडून आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांना देखील लक्ष्य केले जाऊ शकते, असे ब्रिटिश माध्यमांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येणार नाही, अशा हिंदी महासागरातील ‘दिएगो गार्सिया’ येथे ‘बी-५२’ बॉम्बर्स तैनात केल्याचा दावा केला जातो.

अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीशी बोलताना पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांनी या तैनातीबाबत सांगितले. इराणने आपल्या क्षेपणास्त्रांचा मोठा साठा डोंगरभागात तसेच भुयारात दडवून ठेवला आहे. बंकर बस्टर्स बॉम्बने सज्ज असलेली ही ‘बी-५२’ बॉम्बर्स विमाने इराणची ही क्षेपणास्त्रे नष्ट करू शकतात. त्यामुळे ‘दिएगो गार्सिया’ तळावरील ‘बी-५२’ बॉम्बर्सही ही तैनाती अतिशय महत्त्वाची असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आखातात या घडामोडी सुरू असताना अमेरिकेने उताह प्रांतात ५२ ‘एफ-३५’ अतिप्रगत लढाऊ विमानांचे ‘एलिफंट वॉक’ घडवून शक्तीप्रदर्शन केले. १९३० किलोमीटर प्रतितास या वेगाने उड्डाण करणारे ‘एफ-३५’ विमान अवघ्या काही मिनिटांमध्ये अमेरिका ते इराणचा प्रवास करू शकते.

अमेरिकेच्या वायुसेनेकडून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी अशाप्रकारच्या सरावाचे आयोजन केले होते. या सरावात वायुसेनेचे तीन स्क्वाड्रनमधील लढाऊ विमाने एका ठराविक फॉर्मेशनमध्ये सलग उड्डाण करतात. हत्तींच्या कळपाच्या चालीने जंगल हादरते, त्याचप्रकारे या अतिप्रगत लढाऊ विमानांच्या उड्डाणामुळे आसमंत हादरतो, असा दावा अमेरिकी वायुसेनेकडून केला जातो.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info