लिबियामध्ये इंधन कंपनीकडून ‘इमर्जन्सी’ची घोषणा – जर्मनीमध्ये लिबियाप्रकरणी महत्त्वाची बैठक सुरू

लिबियामध्ये इंधन कंपनीकडून ‘इमर्जन्सी’ची घोषणा – जर्मनीमध्ये लिबियाप्रकरणी महत्त्वाची बैठक सुरू

त्रिपोली – लिबियातील इंधनसाठ्यावरील ताबा मिळविण्यासाठी सरकार आणि बंडखोर लष्करामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता दिसत आहे. हफ्तार बंडखोरांनी लिबियाच्या पूर्वेकडील इंधन कंपन्या व प्रकल्पांना टाळे ठोकल्याच आरोप लिबियन सरकारने केला. त्याचबरोबर हफ्तार बंडखोरांनी पूर्वेकडील भागात केलेल्या या कारवाईवर लिबियाच्या सरकारी इंधन कंपनीने टीका केली असून ‘इमर्जन्सी’ अर्थात आणीबाणीची घोषणा केली आहे. तर आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष पुरवावे, असे आवाहन लिबियन सरकार करीत आहे.

इंधन कंपनी, इमर्जन्सी ची घोषणा, हफ्तार, इंधन, टीका, लिबिया, जर्मनी, रशियाउत्तर आफ्रिकेतील लिबिया हा इंधनसंपन्न देश आहे. लिबियातून प्रतिदिन १३ लाख बॅरेल्स इंधनाची निर्मिती केली जाते. इटली हा लिबियन इंधनाचा सर्वात मोठा ग्राहकदेश आहे. तर त्यापाठोपाठ चीन, फ्रान्स व ब्रिटन हे देखील देखील लिबियाकडून इंधनाची खरेदी करतात. इंधनाच्या निर्यातीवरच लिबियाची अर्थव्यवस्था आधारलेली असून या देशातील इंधनाचे महत्त्वाचे साठे पूर्वेकडील भागात आहेत व आता या भागावर हफ्तार बंडखोरांचे नियंत्रण आहे.

लिबियातील सराज राजवटीविरोधात बंडखोर लष्करप्रमुख जनरल खलिफा हफ्तार यांनी नवा संघर्ष पुकारला आहे. आतापर्यंत राजधानी त्रिपोलीवर ताबा मिळविण्यासाठी हल्ले चढविणार्‍या हफ्तार बंडखोरांनी आपल्या ताब्यातील इंधनप्रकल्पांनाच टाळे ठोकल्याचा ठपका लिबियन सरकार व सरकारी इंधन कंपनी ‘एलएनओ’ने ठेवला आहे. तसेच लिबियातील अर्ध्याहून अधिक इंधनाचे उत्पादन ठप्प झाल्याचे म्हटले आहे. पण बंडखोरांनी लिबियन सरकारचा हा आरोप फेटाळला.

लिबियन नागरिक सरकारविरोधी संतापामुळे इंधन प्रकल्प बंद करीत असल्याचे बंडखोर संघटनेचे प्रवक्ते अहमद मिसमारी यांनी सांगितले. लिबियन सरकार आपल्याविरोधात अपप्रचार करीत असल्याचे ताशेरे मिसमारी यांनी ओढले. त्याचवेळी हफ्तार बंडखोरांशी संलग्न असलेल्या टोळ्यांनी ‘झुईतिना बंदर प्रकल्पा’चा ताबा घेतला असून या ठिकाणाहून होणारी इंधनाची निर्यातच बंद केल्याची माहिती समोर येत आहे.

इंधन कंपनी, इमर्जन्सी ची घोषणा, हफ्तार, इंधन, टीका, लिबिया, जर्मनी, रशियालिबियन बंडखोरांकडून इंधनाची निर्यात ठप्प करण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष पुरवावे, असे आवाहन लिबियन सरकार करीत आहे. सध्या जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये युरोपिय देशांनी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. लिबियातील संघर्षाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक सुरू असून यामध्ये युरोपिय देशांच्या नेत्यांबरोबरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन देखील उपस्थित आहेत.

तर लिबियन पंतप्रधान सराज तसेच बंडखोर लष्करप्रमुख जनरल हफ्तार यांना देखील या बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. लिबियातील संघर्ष थांबवावा, असे आवाहन अमेरिका, रशिया, युरोपिय देश व संयुक्त राष्ट्रसंघ करीत आहे. दरम्यान, याआधी रशियामध्ये लिबियन नेत्यांची बैठक पार पडली होती. पण लिबियन सरकार व तुर्कीच्या मागण्या मान्य नसल्याचे सांगून जनरल हफ्तार यांनी या बैठकीतून माघार घेतली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info