अमेरिकन संसदेने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव बहुमताने फेटाळला

अमेरिकन संसदेने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव बहुमताने फेटाळला

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई (महाभियोग) करण्याचा प्रस्ताव संसदेने फेटाळून लावला आहे. बुधवारी अमेरिकी संसदेचे वरिष्ठ सभागृह असणार्‍या सिनेटमध्ये ‘महाभियोगा’ संदर्भातील दोन प्रस्तावांवर मतदान घेण्यात आले. हे दोन्ही प्रस्ताव संसदेने बहुमताने फेटाळले असून ही घटना ट्रम्प विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जातो. डोनाल्ड ट्रम्प यांनी निकालाचे स्वागत केले असून संसदेतील हा विजय या वर्षाच्या अखेरीस होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा घटक ठरेल, असे मत विश्‍लेषकांनी व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना केलेल्या फोनमध्ये, डेमोक्रॅट पक्षाचे नेते व उमेदवार जो बिडेन यांच्या प्रकरणाबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष पदावरील व्यक्तीने अशा प्रकारे वर्तन करणे योग्य नसल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग आणि संसदेच्या कामात अडथळा असे दोन आरोप ठेवण्यात आले होते.

अमेरिकी संसदेचे कनिष्ठ सभागृह असणार्‍या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये ‘डेमोक्रॅट’ पक्षाचे वर्चस्व आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव २३० विरुद्ध १९७ मतांनी मंजूर झाला होता. डिसेंबर महिन्यात झालेल्या या मतदानानंतर सदर प्रस्ताव मतदानासाठी सिनेटमध्ये दाखल झाला होता. अमेरिकी नियमांनुसार सिनेटमध्ये सदर प्रस्ताव मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश बहुमत आवश्यक मानले जाते. मात्र सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असल्याने महाभियोगाला मंजुरी मिळणे अशक्य मानले जात होते. 

बुधवारी झालेल्या मतदानात याला दुजोरा मिळाला असून दोन्ही प्रस्ताव ५२ विरुद्ध ४८ आणि ५३ विरुद्ध ४७ अशा मतांनी फेटाळण्यात आले. पहिल्या प्रस्तावादरम्यान रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर मिट रोम्नी यांनी विरोधात मतदान केल्याचे उघड झाले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकी जनतेने टाकलेल्या विश्‍वासाचा दुरुपयोग केला, अशा शब्दात रोम्नी यांनी आपल्या विरोधी मताचे समर्थन केले.

संसदेकडून महाभियोगाची प्रक्रिया सुरू होऊन सिनेटमध्ये प्रस्ताव फेटाळला जाण्याची अमेरिकेच्य इतिहासातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी ‘अँड्य्रू जॉन्सन’ व ‘बिल क्लिंटन’ यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई करण्यात आली होती. दोन्ही राष्ट्राध्यक्षांविरोधातील कारवाईचे प्रस्ताव सिनेटमध्ये फेटाळले गेले होते.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधातील प्रस्ताव राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असलेल्या वर्षातच फेटाळला गेला आहे. ट्रम्प यांनी सातत्याने आपल्याविरोधातील आरोपांचे खंडन करताना विरोधकांची कारवाई म्हणजे पोकळ दावे असल्याचे म्हटले होते. महाभियोग अपयशी ठरल्याने ट्रम्प यांना यावर्षाच्या अखेरीस होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जबरदस्त फायदा मिळेल, असे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info