जगभरातील ६० टक्के जनतेला ‘वुहान कोरोनाव्हायरस’ची लागण होईल – हाँगकाँगच्या विख्यात तज्ज्ञांचा इशारा

जगभरातील ६० टक्के जनतेला ‘वुहान कोरोनाव्हायरस’ची लागण होईल – हाँगकाँगच्या विख्यात तज्ज्ञांचा इशारा

हाँगकाँग/बीजिंग – ‘वुहान कोरोनाव्हायरस’वर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना अपयशी ठरल्या, तर जगातील तब्बल ६० टक्के लोकसंख्येला या रोगाची लागण होऊ शकते, असा गंभीर इशारा हाँगकाँगमधील प्रमुख वैद्यकतज्ज्ञ प्राध्यापक गॅब्रिएल लुंग यांनी दिला. त्याचवेळी चीनमधील वरिष्ठ सल्लागारांनी येत्या काही दिवसात ‘वुहान कोरोनाव्हायरस’ची साथ अधिक वेगाने पसरू शकते, असे बजावले आहे. एकापाठोपाठ आलेल्या या गंभीर इशार्‍यांमुळे ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीचे संकट लवकर टळण्याची शक्यता मावळल्याचे संकेत मिळत आहेत.

चीनमध्ये डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या ‘वुहान कोरोनाव्हायरस’ची साथ दिवसेंदिवस अधिकच गंभीर रूप धारण करीत आहे. सोमवारी २४ तासांच्या कालावधीत ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या १०८ बळींची नोंद झाली असून सर्व बळी चीनमधीलच आहेत. या बळींमुळे ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीत बळी पडलेल्यांची आकडेवारी हजाराच्या वर जाऊन पोहोचली आहे. त्याचवेळी जगातील २५हून अधिक देशांमध्ये ‘वुहान कोरोनाव्हायरस’ची लागण झालेल्या ४३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

ही व्याप्ती वाढत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. इंधन व सोन्याच्या दरांसह विविध शेअरबाजारांमध्ये साथीचे परिणाम दिसून येत असून जागतिक व्यापार व औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय चीनला खाजगी उद्योग सुरू करण्याबाबत विनंती करीत असला तरी चीन सरकारने याबाबत ठाम भूमिका घेत मोठे व महत्त्वाचे उपक्रम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसण्यास सुरुवात झाली असून इतर देशांमधील काही कंपन्यांनीही कारखाने व संबंधित काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत असतानाच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘वुहान कोरोनाव्हायरस’बाबत नवे इशारे देण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या २४ तासांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीचे इतर देशांमधील रुग्णही वाढत असून ही बाब या रोगाबाबत केवळ हिमनगाचे टोक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना हाँगकाँगचे आघाडीचे वैद्यकतज्ज्ञ प्राध्यापक लुंग यांनी, हा हिमनग नक्की किती मोठा असेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, याकडे लक्ष वेधले.

‘रोगाची लागण झालेली प्रत्येक व्यक्ती दोन ते अडीचजणांना संसर्ग घडवू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या वेगाचा विचार केला तर वुहान कोरोनाव्हायरसची लागण जगातील ६० ते ८० टक्के जणांना होऊ शकते’, असा दावा लुंग यांनी केला. जगातील ६० टक्के लोकसंख्या हा नक्कीच मोठा व भयावह आकडा आहे, असेही लुंग पुढे म्हणाले. लुंग यांच्या या इशार्‍यापाठोपाठ चीन सरकारमधील वरिष्ठ सल्लागार झाँग नान्शान यांनीही येत्या काही दिवसात चीनमध्ये ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीची लागण होणार्‍यांची संख्या वाढू शकते, असे बजावले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत साथीचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढलेला असू शकतो, असा दावा सल्लागारांनी यावेळी केला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info