Breaking News

आता बोलिव्हियात गृहयुद्धच सुरू करणार – माजी राष्ट्राध्यक्ष मोरालेस यांच्या समर्थकांची धमकी

ला पाझ – बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष इवो मोरालेस यांनी राजीनामा देऊन मेक्सिकोत पलायन केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. राजधानी ‘ला पाझ व एल अल्तो’मध्ये मोरालेस यांच्या समर्थकांनी हिंसक निदर्शने सुरू केली असून आता बोलिव्हियात गृहयुद्धच सुरू करणार असल्याची धमकी दिली आहे. मोरालेस यांच्या राजीनाम्यानंतर संसदेतील नेत्या जेनिन अनेझ यांनी हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली होती. त्यानंतर मोरालेस यांच्या समर्थकांनी हिंसाचाराला सुरुवात केली असून हा देश आता अराजकाच्या दिशेने पुढे चालल्याचे दिसत आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इवो मोरालेस यांनी स्वतःला विजयी घोषित केले होते. त्यांच्या या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली व व्यापक निदर्शने सुरू झाली. काही दिवसातच या निदर्शनांना हिंसक वळण लागले. त्याचवेळी देशाच्या अनेक भागातील पोलीसयंत्रणा व त्यापाठोपाठ लष्कराने राष्ट्राध्यक्ष मोरालेस यांना सहकार्य करण्याचे नाकारले. बोलिव्हियातील सुरक्षायंत्रणांवर असलेले नियंत्रण गमावल्याने कोंडीत सापडलेल्या मोरालेस यांना राजीनामा देणे भाग पडले होते.

मोरालेस यांच्यापाठोपाठ संसदेतील चार प्रमुख नेत्यांनी राजीनामे दिल्याने देशात राजकीय अस्थैर्याची स्थिती निर्माण झाली. ही स्थिती मोडून काढण्यासाठी संसदेतील उजव्या गटाच्या नेत्या जेनिन अनेझ यांनी हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेण्याचे जाहीर केले. अनेझ यांच्या निर्णयाला देशातील सुरक्षायंत्रणांसह अमेरिका, रशिया, ब्राझिल, कोलंबिया या देशांनी समर्थन दिले. मात्र उजव्या गटाच्या नेत्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून पदावर आल्याने मोरालेस यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली.

याच नाराजीतून आता मोरालेस यांच्या समर्थकांनी देशाच्या राजधानीसह विविध भागांमध्ये निदर्शने सुरू केली आहेत. मोरालेस यांना सत्तेवरून उलथणे हा कट असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला असून हा कट उधळण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी देशात जोरदार संघर्ष भडकवून गृहयुद्ध सुरू करण्याची धमकी माजी राष्ट्राध्यक्ष मोरालेस यांच्या समर्थकांनी दिली. या हिंसक निदर्शकांविरोधात सुरक्षायंत्रणांनी कारवाई सुरू केली असून त्यात काहीजण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

    

माजी राष्ट्राध्यक्ष मोरालेस यांनी राजीनाम्यानंतर देशाबाहेर पलायन करून मेक्सिकोत आश्रय घेतला आहे. आपल्याला सत्तेवरून खाली खेचण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप करून बोलिव्हियात सुरू झालेले आंदोलन ‘कलर रिव्होल्युशन’चा भाग असल्याचा दावा केला. युरोपातील ‘बाल्कन’ देश तसेच एकेकाळी रशियन संघराज्याचा भाग असणार्‍या देशांमध्ये सत्ताधारी राजवटींविरोधात झालेल्या आंदोलनांना ‘कलर रिव्होल्युशन’ म्हटले जाते. या आंदोलनांमागे अमेरिकेचा हात असल्याचे कालांतराने उघड झाले होते. त्याच धर्तीवर बोलिव्हियामधील आपली सत्ता उलथण्यात आल्याचा दावा मोरालेस करीत आहेत.

गेल्या काही वर्षात लॅटिन अमेरिकेतील ब्राझिल, कोलंबिया यासारख्या देशांमध्ये जवळपास दशकभरापासून सत्तेवर असलेल्या डाव्या विचारसरणीच्या राजवटी कोसळल्या आहेत. व्हेनेझुएलात राजकीय परिवर्तनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इक्वेडोर व चिलीमध्ये सरकारविरोधात आंदोलने पेटली आहेत. या पार्श्‍वभूमीवर बोलिव्हियात मोरालेस यांची सत्ता उलथली असून यामुळे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये सुरू असलेली खदखद प्रकर्षाने जगासमोर आली आहे.

English    हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info