अमेरिकी सर्व्हर्सचा वापर करून इराणचे इस्रायली प्रकल्पांवर सायबरहल्ले

अमेरिकी सर्व्हर्सचा वापर करून इराणचे इस्रायली प्रकल्पांवर सायबरहल्ले

जेरुसलेम/वॉशिंग्टन – इस्रायलकडून सिरियातील इराणच्या तळांवर सुरू असलेल्या घणाघाती हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने सायबरहल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या जल व सांडपाणी प्रकल्पांवर सायबरहल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे अमेरिकी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. या सायबरहल्ल्यासाठी इराणने अमेरिकी सर्व्हर्सचा वापर केल्याचे समोर आले आहे.

एप्रिल महिन्याच्या २४ व २५ तारखेला इराणने सायबरहल्ल्याचा प्रयत्न केल्याची बातमी ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने दिली. इस्रायलच्या पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या ‘कमांड व कंट्रोल सिस्टिम्स’ वर सायबरहल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. इस्रायलच्या ‘वॉटर अथॉरिटी’ व ‘नॅशनल सायबर डिरेक्टरेट’ या दोन्ही यंत्रणांना याची जाणीव झाल्यावर त्यांनी तातडीने पावले उचलली. प्रकल्पांवर काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तातडीने अलर्ट देण्यात आला.

इस्रायली यंत्रणांनी सायबरहल्ला रोखण्यात यश मिळवले असले तरी इराणचा हा प्रयत्न लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. इस्रायलवरील या सायबरहल्ल्यासाठी इराणी हॅकर्सनी अमेरिकेतील सर्व्हर्सचा वापर केला आहे. इराणकडून झालेला अमेरिकी सर्व्हर्सचा वापर अमेरिकेतील यंत्रणांसाठीही धोक्याचा इशारा मानला जातो.

अमेरिका व इस्रायलच्या यंत्रणांनी इराणी सायबरहल्ल्याचा या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सहकारी देशांना सायबरहल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचे वक्तव्य एक वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे.

इस्रायल व इराणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सायबरयुद्ध सुरू असून इराणी हॅकर्सनी अनेकदा इस्रायली लष्कर व इतर यंत्रणांवर हल्ले केल्याचे दावे केले आहेत. इस्रायलने ‘स्टक्सनेट’ या मालवेअरच्या सहाय्याने इराणच्या अणुकार्यक्रमालाच लक्ष्य केले होते. या सायबरहल्ल्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षांनी मागे गेल्याचे मानले जाते. इराणवरील या सायबरहल्ल्यासाठी अमेरिकेने इस्रायलला सहाय्य केल्याचे उघड झाले होते.