Breaking News

अमेरिकेला रोखण्यासाठी चीनने हजार अण्वस्त्रांनिशी सज्ज राहावे – चीनच्या मुखपत्राचा आपल्या सरकारला सल्ला

बीजिंग – अमेरिकेच्या सामरिक महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी चीनने किमान हजार अण्वस्त्रांसह सज्ज रहावे असा सल्ला ‘ग्लोबल टाईम्स’ या चिनी दैनिकाने दिला आहे. अण्वस्त्रे निरुपयोगी असतात, असा भोळसट विचार न बाळगता अमेरिकी राज्यकर्त्यांचा चीनसंबंधातील दृष्टिकोन बदलण्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो याची जाणीव ठेवा, अशी आक्रमक भूमिका ‘ग्लोबल टाईम्स’चे संपादक हु शिजिन यांनी मांडली आहे. सध्या चीनकडे तीनशेहून अधिक अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात येते.

शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यात चीनशी निगडीत मुद्द्यांचाही समावेश होता. यादरम्यान ‘स्टार्ट’ या क्षेपणास्त्र व अण्वस्त्र कराराबाबत बोलणी झाल्याचे आणि ट्रम्प यांनी त्यात चीनच्या समावेशाचा पुनरुच्चार केल्याचेही सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी दैनिक असणाऱ्या ग्लोबल टाईम्समधील लेख लक्ष वेधून घेणारा ठरतो.

ग्लोबल टाईम्सचे संपादक शिजिन यांनी लिहिलेल्या संपादकीय लेखाचे शीर्षकच चीनने अण्वस्त्रांची संख्या हजारांपर्यंत वाढवण्याची गरज आहे, असे आहे. चीन सरकारला हजार अण्वस्त्रांनी सज्ज होण्याचा सल्ला देतानाच त्यात किमान १०० ‘डाँगफेंग-४१’ ही ‘स्ट्रॅटेजिक मिसाईल्स’ व ‘जुलांग’ क्षेपणास्त्रांचाही समावेश हवा, अशी मागणीही केली आहे. ही मागणी करतानाच चीन हा शांतताप्रिय देश असल्याचा आणि पहिल्यांदा अण्वस्त्र न वापरण्यासाठी वचनबद्ध असल्याचा दावाही केला.

आपण अधिक अण्वस्त्रांची मागणी करीत असल्याने काहीजण आपल्याला युद्धखोर म्हणतीलही, पण त्यांनी हा शिक्का अमेरिकी नेत्यांवर मारावा, असा टोला शिजिन यांनी लगावला आहे. चीनला अमेरिकेबरोबर शांततापूर्ण सहकार्य हवे असले तरी चीन त्याची भीक मागणार नाही आणि ते सामरिक बळावरच मिळविता येईल, अशी आक्रमक भूमिका लेखात मांडण्यात आली आहे. अमेरिकेला फक्त सामर्थ्याचीच भाषा समजते, असे सांगून चीनने अण्वस्त्रसज्जतेला तातडीने वेग द्यायला हवा, असा आग्रही सूर शिजिन यांनी लेखाच्या अखेरीस धरला आहे.

‘ग्लोबल टाईम्स’ हे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीची भूमिका मांडणारे दैनिक म्हणून प्रसिद्ध आहे. यापूर्वी चीनच्या नेत्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी या दैनिकात आलेल्या लेखांचे तसेच वक्तव्यांचे समर्थनही केले होते. त्यामुळे यातून प्रसिद्ध होणारे लेख चीनच्या धोरणांचे संकेत मानले जातात. हे लक्षात घेता १००० अण्वस्त्रांचा सल्ला म्हणजे चीनने आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे, हे दर्शविणारी बाब ठरते.

गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अहवालात, चीनने गुप्तपणे आण्विक चाचण्या केल्याचे नमूद करण्यात आले होते. यासंदर्भातील माहिती दडविल्याने चीनच्या हेतूंवर संशयही उपस्थित करण्यात आला होता.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info