Breaking News

तैवानवरील चिनी आक्रमणाचा धोका वाढला – तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

तैपेई – ‘चीनची सत्ताधारी राजवट तैवानच्या हद्दीनजिक आपली संरक्षणतैनाती वेगाने वाढविताना दिसत आहे. तैवानची समस्या झटपट संपवून टाकण्याचा उद्देश या हालचालींमागे दिसत आहे. चीनच्या या हालचाली तैवानवरील चिनी आक्रमणाचा धोका अधिकच वाढल्याचे संकेत देणाऱ्या आहेत’, असा गंभीर इशारा तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने चीनच्या लष्कराने तैवानवर हल्ला चढविल्यास काही तासातच तैवान ताब्यात येईल, अशा शब्दात धमकावले होते.

‘चीनची लढाऊ विमाने जवळपास दररोज तैवानच्या हद्दीत धडका मारीत आहेत. गेल्या महिन्यात चीनच्या लढाऊ विमानांच्या घुसखोरीचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे. तैवानच्या सागरी हद्दीतही सातत्याने आक्रमक हालचाली सुरू आहेत. चीनच्या संरक्षणदलांकडून तैवानवरील हल्ल्याचे उद्दिष्ट ठेवून वारंवार सराव करण्यात येत आहेत. चीनच्या वाढत्या हालचाली आमच्यासाठी तीव्र चिंतेचा विषय ठरला आहे’, या शब्दात तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चिनी आक्रमणाच्या धोक्याकडे लक्ष वेधले.

कोरोनाची साथ, मंदावणारी अर्थव्यवस्था आणि महापुरांची हाताळणी करण्यात चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट अपयशी ठरली आहे. त्यामुळे या राजवटीवर अंतर्गत पातळीवरून प्रचंड दबाव आहे. या अपयशापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तैवानला बळीचा बकरा बनवून त्यावर हल्ला चढविला जाऊ शकतो, याची जाणीव परराष्ट्रमंत्री वु यांनी करून दिली.

यावेळी तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगवर केलेल्या कारवाईचीही आठवण करून दिली. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने हॉंगकॉंगच्या मुद्द्यावर चीनला कठोर संदेश दिला नाही, तर निर्ढावलेली चीनची राजवट इतर गोष्टींबाबतही त्याचीच पुनरावृत्ती करेल, अशी भीतीही परराष्ट्रमंत्री वु यांनी व्यक्त केली. चिनी आक्रमणाचा मुकाबला करायचा असेल तर तैवानला अमेरिका व जपानसारख्या सहकारी देशांबरोबरील समन्वय अधिक वाढवावा लागेल, असा दावाही त्यांनी पुढे केला.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट साऊथ चायना सी तसेच ईस्ट चायना सी क्षेत्रातील काही भागांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करेल, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी मे महिन्यात दिला होता. हा इशारा देण्यापूर्वी तसेच त्यानंतरच्या काळात चीनकडून तैवानविरोधातील हालचाली जास्तच वाढल्याचे दिसून येते. मे महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये झालेल्या एका बैठकीत कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी तैवानवर हल्ला चढवण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याची आग्रही भूमिका मांडली होती.त्साई इंग-वेन यांची तैवानच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेली फेरनिवड हा त्यामागील प्रमुख घटक असून त्यामुळे चीनचा तैवानविरोधातील पवित्रा अधिक आक्रमक होण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

चीनकाडून तैवानविरोधात सुरू झालेल्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यात, अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षणसाहित्य पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यात लढाऊ विमाने, ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे, ‘पॅट्रिऑट मिसाईल सिस्टीम’ सह टोर्पेडोचा समावेश आहे. अमेरिकेने आपल्या विमानवाहू युद्धनौकांसह विनाशिका, बॉम्बर्स, ड्रोन्स व टेहळणी विमानांची तैनाती व वावरही वाढविला आहे. त्याचवेळी तैवानवरील संभाव्य हल्ल्याविरोधात अमेरिकेला लष्करी कारवाईची परवानगी देणारा कायदा आणण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. ‘तैवान इन्व्हेजन प्रिव्हेंशन ॲक्ट’ असे संसदेत दाखल होणाऱ्या विधेयकाचे नाव असून, त्यानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना तैवानच्या मुद्दावर लष्करी बळाचा वापर करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

English       हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info