रशियाकडून युक्रेनमध्ये लेझर वेपन यंत्रणेचा वापर

- मारिपोल फॅक्टरीतील 1700हून अधिक जवान रशियाच्या ताब्यात

मॉस्को – युक्रेनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईत रशियाने ‘झदिरा’ या प्रगत ‘लेझर वेपन सिस्टिम’चा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांनी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसात रशियन मोहिमेला मोठे धक्के बसत असल्याचे दावे युक्रेन व पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर लेझर वेपन्सचा वापर रशिया युद्धाची तीव्रता अधिक वाढवित असल्याचे संकेत देणारा ठरतो. दरम्यान, डोन्बास क्षेत्रातील पूर्व लुहान्स्क भागात रशियाने 16 हजार युक्रेनी जवानांची कोंडी केल्याचा दावा स्थानिक रशियासमर्थक अधिकाऱ्याने केला आहे.

युक्रेनमधील डोन्बास क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी रशियाकडून आक्रमक हल्ले सुरू आहेत. ही कारवाई सुरू असतानाच मार्च महिन्यात रशियन फौजांनी ताब्यात घेतलेल्या काही भागांमध्ये रशियाला धक्के बसत असल्याचे दावे युक्रेन व पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, युद्धात रशियाच्या नियंत्रणाखाली असलेले भाग युक्रेन पुन्हा ताब्यात घेईल, असा दावा केला आहे. पुतिन यांची युक्रेन मोहीम पूर्णपणे फसल्याचेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियाची मोहीम लष्करी, राजकीय तसेच राजनैतिकदृष्ट्या अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे.

रशिया लवकरच आपला पराभव मान्य करून युक्रेन मोहीम थांबवेल, असे दावे प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाकडून युक्रेनमध्ये लेझर वेपन्सचा वापर झाल्याचे वृत्त समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते. रशियाच्या उपपंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झदिरा’ नावाच्या लेझर वेपनमध्ये पाच किलोमीटर अंतरावर असलेले ड्रोन्स पाच सेकंदात भस्मसात करण्याची क्षमता आहे. त्याचवेळी ही यंत्रणा दीड हजार किलोमीटर अंतरावरील उपग्रहाला निष्प्रभ करु शकते, असा दावाही उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांनी केला. युक्रेनच्या संरक्षणदलांना परदेशी उपग्रहांची मोठी मदत मिळत असून युक्रेनी फौजा ड्रोन्सचा प्रभावी वापर करीत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने ड्रोन व उपग्रहभेदी लेझर वेपन तैनात करून त्याचा वापर सुरू करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

‘लेझर वेपन’ पाठोपाठ रशियाने ‘टर्मिनेटर’ या नावाने ओळखण्यात येणारा नवा रणगाडाही युक्रेनविरोधातील मोहिमेत तैनात केल्याचे उघड होत आहे. या रणगाड्यात ‘ग्रेनेड लाँचिंग सिस्टिम’ तसेच ‘अँटी टँक सिस्टिम’चा समावेश आहे. डोन्बासमधील कारवाईत रशियन फौजांनी याचा वापर सुरू केल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. ‘झदिरा’ व ‘टर्मिनेटर’ या प्रगत शस्त्रांचा वापर सुरू करून रशियाने युक्रेनमधील मोहिम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. डोन्बासमधील ‘ईस्टर्न लुहान्स्क’ भागात रशियन संरक्षणदलांनी 16 हजार युक्रेनी जवानांना कोंडीत पकडल्याची माहिती रशिया समर्थक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, सोमवारी रशियासमोर शरणागती पत्करल्यानंतर मारिपोलच्या स्टील फॅक्टरीतील 1,730 जवानांना रशियाने ताब्यात घेतले आहे. यातील 200हून अधिक जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली. स्टील फॅक्टरीत युक्रेनच्या सुमारे दोन हजारांहून अधिक जवानांनी आश्रय घेतल्याचा दावा करण्यात आला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info