Breaking News

चीनची घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिका जपानला सहाय्य करणार

टोकियो – चीनकडून जपानच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अमेरिका जपानला पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही जपानमधील ‘युएस फॉर्सेस’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल केव्हिन श्ऩायडर यांनी दिली. गेल्या वर्षभरात चिनी जहाजे तसेच विमानांची ईस्ट चायना सी क्षेत्रातील घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चीनकडून सध्या सुरू असणाऱ्या कारवाया पाहता त्यांची तीव्रता नजीकच्या काळात अधिकच वाढण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेने त्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या असून जनरल श्ऩायडर यांचे वक्तव्य त्याला दुजोरा देणारे ठरते.

घुसखोरी रोखण्यासाठी, चीन, अमेरिका,

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून आपल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी विविध भागांमध्ये लष्करी तैनाती वाढवितानाच वादग्रस्त भागांमध्ये घुसखोरीचे प्रयत्नही चीनकडून सुरू आहेत. जपाननजीक असलेल्या ‘ईस्ट चायना सी’ क्षेत्रात चीनकडून सातत्याने युद्धनौका, लढाऊ विमाने, पाणबुड्या व गस्ती नौकांच्या सहाय्याने घुसखोरी सुरू आहे. गेल्या महिन्यात जपानच्या ‘ओशिमा आयलंड’ जवळ चीनची प्रगत पाणबुडी धोकादायकरित्या वावरत असल्याचे आढळले होते.

 

जपानी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या गस्ती नौका गेले तीन महिने सातत्याने जपानच्या ईस्ट चायना सीमधील हद्दीत घुसखोरी करीत आहेत. यापूर्वीच्या काळात चिनी नौका घुसखोरी करून काही तासातच माघारी जात होत्या. पण आता चीनने हा कालावधी जाणीवपूर्वक वाढविल्याचे दिसत आहे. मार्च २०१९ ते २०२० या एका वर्षाच्या कालावधीत चीनच्या लढाऊ तसेच टेहळणी विमानांनी ९००हून अधिक वेळा जपानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला, अशी माहितीही जपानी लष्कराकडून देण्यात आली आहे. या वाढत्या घुसखोरीमागे ईस्ट चायना सीसह सेंकाकू बेटांवरील आपला दावा अधिक भक्कम करण्याची योजना असल्याचे जपानी विश्लेषकांचे मत आहे.

 

घुसखोरी रोखण्यासाठी, चीन, अमेरिका,
अमेरीकी कमांडरनी येत्या काही काळात घुसखोरीचे प्रमाण पुन्हा वाढू शकते, असा दावा केला. चीनच्या यंत्रणांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्या मच्छीमारी बोटींवर निर्बंध लादले होते. हे निर्बंध उठल्यानंतर चीनच्या मच्छिमारी बोटी, तटरक्षक दल व नौदलाच्या जहाजांसह पुन्हा एकदा ईस्ट चायना सीमधील सेनकाकू बेटांच्या हद्दीत धडका मारण्यास सुरुवात करतील, याकडे युएस फोर्सेसचे प्रमुख जनरल श्ऩायडर यांनी लक्ष वेधले. सेनकाकू बेटांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची स्थिती निर्माण झाल्यास जपानला संपूर्ण सहाय्य करण्यास अमेरिका १०० टक्के सज्ज आहे, अशी ग्वाही अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेची जपानसाठीची ही वचनबद्धता, वर्षाचे ३६५ दिवस, आठवड्याचे सात दिवस व दिवसाचे २४ तास कायम असेल, असेही लेफ्टनंट जनरल केव्हिन श्ऩायडर यांनी बजावले आहे.

 

घुसखोरी रोखण्यासाठी, चीन, अमेरिका,
अमेरिकेचे ८०हून अधिक छोटे-मोठे संरक्षणतळ जपानमध्ये कार्यरत आहेत. या तळांवर अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेसह अनेक लढाऊ विमाने व ५४ हजारांहून अधिक जवान तैनात आहेत. अमेरिका व जपानमधील करारानुसार,जपानच्या सुरक्षेला कोणताही मोठा धोका निर्माण झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचे अधिकार अमेरिकेला आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, चीनच्या वाढत्या कारवायांनंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी जपानच्या सुरक्षेबाबत दिलेली ग्वाही महत्त्वाची ठरते.

 

अमेरिकी अधिकार्‍यांचे वक्तव्य समोर येत असतानाच, जपान व अमेरिकेत लढाऊ विमानांच्या आधुनिकीकरणासाठी करारावर स्वाक्षरी झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या बोइंग व जपानच्या ‘मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज’ या कंपन्यांमध्ये हा करार झाला आहे. करारानुसार, जपानच्या हवाई दलातील ‘एफ-१५ जे इंटरसेप्टर’ मध्ये नवी रडार व इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यंत्रणा आणि प्रगत क्षेपणास्त्रे बसविण्यात येणार आहेत. जपानच्या हवाईदलात २०० ‘एफ-१५ जे’ लढाऊ विमानांचा ताफा असून त्यातील सुमारे १०० विमानांचे आधुनिकीकरण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी जपानने यापूर्वीच, अमेरिकेकडून १४०हून अधिक ‘एफ-३५‘ या लढाऊ विमानांसाठी करार केला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info