आर्मेनिया-अझरबैजान युद्धात अझरबैजानचे तीन हजार जवान मारले गेल्याचा दावा

आर्मेनिया-अझरबैजान युद्धात अझरबैजानचे तीन हजार जवान मारले गेल्याचा दावा

येरेवान/बाकु – गेल्या सहा दिवसांपासून मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या युद्धात अझरबैजानचे सुमारे तीन हजार जवान मारल्याचा खळबळजनक दावा आर्मेनियन प्रवक्त्यांनी केला आहे. हा दावा समोर येत असतानाच अमेरिका-रशिया-फ्रान्स या देशांनी आर्मेनिया व अझरबैजान या दोन्ही देशांना संघर्षबंदीचे आवाहन केले आहे. आर्मेनियाने सदर प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी दर्शवली असली तरी तुर्कीने असा प्रस्ताव अस्वीकारार्ह असल्याचे बजावले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात युद्धाची तीव्रता अधिकच वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

तीन हजार जवान

आर्मेनिया-अझरबैजान सीमेवरील ‘नागोर्नो-कॅराबख’ या स्वायत्त प्रांतात गेल्या रविवारपासून जोरदार संघर्ष सुरू आहे. सहा दिवसानंतरही हा संघर्ष थांबला नसून दोन्ही बाजूंकडून परस्परांची मोठी हानी घडविल्याचे दावे करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी अझरबैजानने आर्मेनियन लष्कराचे दोन हजारांहून अधिक जवान मारल्याचे सांगितले होते. आपल्या हल्ल्यांची माहिती देणारे काही व्हिडीओ व फोटोग्राफ्सही अझरबैजानकडून प्रसिद्ध करण्यात आले होते.

अझरबैजानच्या या दाव्यांना प्रत्युत्तर देताना आर्मेनियाच्या प्रवक्त्यांनी, अझरबैजानचे तीन हजारांहून अधिक जवान मारले गेल्याची माहिती दिली. ‘गुप्तचर यंत्रणांच्या हाती आलेल्या माहिती नुसार अझरबैजानी लष्कराचे तीन हजारांहून अधिक जवान मारले गेले आहेत. अनेक जवानांचे मृतदेह युद्धक्षेत्रात पडून असून त्यांच्यासाठी काहीही व्यवस्था करण्यात आलेली नाही’, असा दावा आर्मेनियाचे प्रवक्ते व्हॅग्रॅम पोगोस्यान यांनी केला. शुक्रवारपासून अझरबैजानने हल्ल्यांची तीव्रता वाढविल्याचे वृत्त असून ‘नागोर्नो-कॅराबख’मधील काही ठिकाणे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संघर्षबंदीसाठी जोरदार हालचाली सुरू असतानाच ही माहिती समोर आली आहे.

तीन हजार जवान

अमेरिका, रशिया व फ्रान्सने संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून, आर्मेनिया व अझरबैजान या दोन्ही देशांना ताबडतोब हल्ले थांबविण्याबाबत बजावले आहे. त्याचवेळी या दोन्ही देशांनी विनाशर्त वाटाघाटींसाठी तयार व्हावे, असे आवाहनही केले आहे. आर्मेनियाच्या परराष्ट्र विभागाने चर्चेचा प्रस्ताव स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अझरबैजानला समर्थन देणाऱ्या तुर्कीने अमेरिका, रशिया व फ्रान्सचे आवाहन नाकारले आहे. संघर्षबंदीसाठी हालचाली करणाऱ्या देशांनी गेले ३० वर्षे या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे आता त्यांचा प्रस्ताव अस्वीकारार्ह ठरतो, असा आरोप तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी केला.

यापूर्वी तुर्कीने रशियाकडून आर्मेनिया-अझरबैजान युद्धाबाबत करण्यात आलेले आवाहनही धुडकावले होते. त्यापाठोपाठ आता अमेरिका व फ्रान्सचा पुढाकार असणारा प्रस्तावही नाकारला आहे. त्यामुळे तुर्कीने आर्मेनिया-अझरबैजान मुद्यावरून नाटो देशांनाही दुखावल्याचे दिसत असून, त्याचा मोठा फटका तुर्कीला बसेल, असे संकेत मिळत आहेत.

तीन हजार जवान

दरम्यान, आर्मेनियाचे उपपरराष्ट्रमंत्री अवेत अदोन्त्स यांनी एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अझरबैजानमध्ये पाकिस्तानी जवान सक्रिय असल्याचा पुनरुच्चार केला. ‘पाकिस्तानी जवान तुर्कीच्या माध्यमातून अझरबैजानमध्ये गेले आहेत. आमच्यासाठी ही आश्चर्याची बाब नसून ही बाब पुराव्यांनिशी लवकरच सिद्ध होईल’, असे उपपरराष्ट्रमंत्री अदोन्त्स यांनी सांगितले. अदोन्त्स यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियातुन प्रतिक्रिया उमटली आहे. ‘आर्मेनियाने अजिबात काळजी करू नये. पाकिस्तानी लष्कराचा युद्ध हरण्याचा खूप मोठा इतिहास आहे. पाकिस्तानी जवान तुमच्यासाठी शुभ संकेत ठरतील’, असा टोला भारताच्या एका माजी सुरक्षा अधिकाऱ्याने लगावला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info