बाखमत ताब्यात घेतल्यानंतर रशियाचे मध्य युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचे हल्ले

- ‘एफ-१६’च्या पुरवठ्यावरून रशियाचे अमेरिकेवर टीकास्त्र

मॉस्को/किव्ह/वॉशिंग्टन – डोन्बासमधील बाखमत शहरावर ताबा मिळविल्यानंतर रशियन सैन्याने आपल्या हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढविली आहे. रविवारी रात्री रशियाने मध्य युक्रेनमधील डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतावर मोठे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये नागरी वस्त्यांसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली. दरम्यान, अमेरिकेने ‘एफ-१६’ युक्रेनला पुरविण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर रशियाकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली. ‘एफ-१६’चा पुरवठा हा नाटोचा सहभाग उघड करणारा असून पाश्चिमात्यांना त्याचे भयावह परिणाम भोगावे लागतील, असे रशियाने बजावले.

हल्ले

शनिवारी रात्री रशियाच्या ‘वॅग्नर ग्रुप’ या खाजगी लष्करी कंपनीने बाखमतवर ताबा मिळविल्याची घोषणा केली होती. त्यानंतर रशियाचा संरक्षण विभागा व राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला. युक्रेनकडून त्याविरोधात बरेच दावे करण्यात येत असले तरी बाखमत ताब्यात असल्यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा युक्रेनने सादर केलेला नाही.

हल्ले

गेल्या २४ तासांमध्ये, आमच्या तुकड्या बाखमतमध्ये संघर्ष करीत आहे याव्यतिरिक्त कोणतीही माहिती युक्रेनचे लष्कर अथवा सरकारकडून देण्यात आलेली नाही. दुसऱ्या बाजूला रशियाने बाखमतमध्ये ‘डिमायनिंग’ची प्रक्रिया तसेच तळ उभारण्याचे काम सुरू केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बाखमतवर रशियाचे नियंत्रण असल्याचे स्पष्ट झाले असून युक्रेनचे दावे फोल ठरले आहेत.

बाखमतवरील ताब्यानंतर रशियन सैन्याच्या मोहिमेला अधिक गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत. रशियन सैन्याने गेल्या २४ तासांमध्ये मध्य युक्रेनसह खार्किव्ह, डोनेत्स्क, मेरिन्का, ॲव्हडिव्हका, खेर्सन या भागात मोठी कारवाई केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. मध्य युक्रेनमधील डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतातील डिनिप्रो शहर व जवळच्या भागांमध्ये मोठे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले करण्यात आले.

हल्ले

हल्ल्यासाठी १६ क्रूझ क्षेपणास्त्रे व २० आत्मघाती ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याची माहिती रशियाने दिली. हल्ल्यात युक्रेनी लष्कराच्या धावपट्टीला लक्ष्य करण्यात आले असून विमाने तसेच शस्त्रसाठ्याची हानी झाल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. युक्रेनी लष्कराचे काही जवान ठार झाल्याचेही रशियाच्या संरक्षण विभागाने म्हंटले आहे. तर रशियाच्या हल्ल्यात नागरी वस्तीसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याची मातिहtी युक्रेनने दिली आहे.

दरम्यान, अमेरिकेने ‘जी७’ परिषदेत युक्रेनला ‘एफ-१६’ लढाऊ विमाने पुरविण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते. यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनी, ‘एफ-१६’चा पुरवठा युक्रेन युद्धातील नाटोचा सहभाग अधिक ठळकपणे दाखविणारी घटना ठरते, असा ठपका ठेवला. युक्रेनमध्ये ‘एफ-१६’साठी कोणत्याही सुविधा नसून नजिकच्या काळात ही लढाऊ विमाने नाटोच्या हवाईतळांवरून युक्रेनमध्ये दाखल होऊन कारवाई करू शकतात, असा आरोपही ॲन्टानोव्ह यांनी केला. रशियाचे परराष्ट्र उपमंत्री अलेक्झांडर ग्रुश्को यांनी, ‘एफ-१६’ युक्रेनला मिळाल्यास पाश्चिमात्य देशांना त्याचे भयावह परिणाम भोगावे लागतील, असे बजावले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info