आखातातील दोन हजारांहून अधिक दहशतवादी आर्मेनिया-अझरबैजान युद्धात सामील – रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

आखातातील दोन हजारांहून अधिक दहशतवादी आर्मेनिया-अझरबैजान युद्धात सामील – रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

मॉस्को/येरेवान/बाकु – मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या युद्धात आखातातील सुमारे दोन हजार दहशतवादी सामील झाल्याचा दावा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला आहे. लॅव्हरोव्ह यांनी आपल्या दाव्यात थेट कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही. मात्र गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तुर्की राष्ट्राध्यक्षांशी केलेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगून या दहशतवाद्यांमागे तुर्कीचाच हात असल्याचे संकेत दिले आहेत. रशियासह फ्रान्स, आर्मेनिया व इतर अनेक देशांनी तुर्कीने आर्मेनिया-अझरबैजान युद्धात सिरियन दहशतवाद्यांना उतरविल्याचे आरोप केले होते. तुर्की व अझरबैजान या दोन्ही देशांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून यासंदर्भात दावा समोर आल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आखातातील

आर्मेनिया व अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला असून, संघर्षबंदीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अझरबैजानकडून ‘नागोर्नो-कॅराबख’ प्रांत व नजिकच्या भागातील सुमारे २०० गावे ताब्यात घेतल्याचे दावे करण्यात आले आहेत. नागोर्नो-कॅराबखमधील १२०० हून अधिक आर्मेनियन जवान मारले गेले असून ४० हजारांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. अझरबैजानचे लष्कर नागोर्नो-कॅराबख व आर्मेनियाला जोडणाऱ्या भागानजिक येऊन पोहोचले असून मंगळवारपासून हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यात आल्याचे समोर आले आहे. अझरबैजानच्या मिळालेल्या या यशामागे तुर्कीचा हात असल्याचे उघड झाले आहे.

आखातातील

तुर्कीने अझरबैजानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व इतर संरक्षणसहाय्य पुरविले आहे. त्याचवेळी तुर्कीने आखातातील शेकडो दहशतवादीही नागोर्नो-कॅराबखमध्ये उतरविले आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसातच आर्मेनियाने सिरियन दहशतवादी युद्धात सहभागी झाल्याचा आरोप केला होता. आर्मेनियाच्या या दाव्यांनंतर फ्रान्स, रशिया, अमेरिका, इराण, सिरिया यासारख्या देशांनीही दहशतवाद्यांच्या मुद्यावरून तुर्कीला फटकारले होते. मात्र तुर्कीने हे आरोप नाकारले होते. या पार्श्वभूमीवर, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यानी पुन्हा एकदा आर्मेनिया-अझरबैजान युद्धामधील दहशतवादाचा उल्लेख करणे लक्ष वेधून घेणारे ठरते. रशियन राष्ट्राध्यक्षांनी हा मुद्दा थेट तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेत उपस्थित केल्याचा उल्लेख करून परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी तुर्कीला लक्ष्य केले आहे. त्याचवेळी रशियाने तुर्कीच्या दहशतवादाचा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट संकेतही रशियन परराष्ट्रमंत्र्यानी दिले.

आखातातील

आर्मेनियाने नागोर्नो-कॅराबखमध्ये अझरबैजानसाठी लढणाऱ्या काही सिरियन दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. यातील एका दहशतवाद्याने आपल्या गटाला, गावातील सर्व आर्मेनियन्सची हत्या करण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी खळबळजनक कबुली दिली आहे. या दहशतवाद्याने आपण तुर्कीमार्गे आल्याचे तसेच दोन हजार डॉलर्सचे आमिष दाखविण्यात आल्याचीही माहिती दिली आहे. सिरियातील किमान हजार दहशतवादी अझरबैजानमध्ये होते, असेही दहशतवाद्याने आपल्या कबुलीत सांगितल्याचे आर्मेनियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दरम्यान, इराणनेही आर्मेनिया-अझरबैजान युद्धात संघर्षबंदीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह अली खामेनी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, आर्मेनियाने नागोर्नो-कॅराबखचा भाग अझरबैजानकडे द्यावा व त्याचवेळी या भागातील सर्व आर्मेनियन्सच्या सुरक्षेची हमी मिळायला हवी, असे म्हटले आहे. त्याचवेळी या भागातून दहशतवाद्यांनी इराणमध्ये यायचा प्रयत्न केला तर त्याविरोधात आक्रमक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. खामेनी यांच्या या ट्विटच्या पार्श्वभूमीवर, रशिया इराणच्या सहाय्याने आर्मेनिया-अझरबैजान संघर्षबंदीसाठी प्रयत्न करीत असल्याचे वृत्त काही रशियन माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info