Breaking News

हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलची गाझावर जोरदार हवाई कारवाई

तेल अविव – इराण व तुर्कीकडून मोठ्या प्रमाणात लष्करी तसेच आर्थिक सहाय्य मिळविणार्‍या हमासने इस्रायलच्या सीमाभागात रॉकेट हल्ले चढविले. या रॉकेट हल्ल्यांना इस्रायली लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले असून यामध्ये हमासची काही ठिकाणे नष्ट केल्याचा दावा केला जातो. इस्रायली लष्कर गाझापट्टीवर हल्ले चढवित असताना, इराणची राजधानी तेहरानमध्ये हमास व इस्लामिक जिहादच्या नेत्यांची भेट झाल्याची माहिती इराणच्या माध्यमांनी प्रसिद्ध केली.

हवाई कारवाई

इस्रायली लष्कराने केलेल्या दाव्यानुसार, शनिवारी रात्री गाझातून इस्रायलच्या अश्दोद शहराजवळ दोन रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यात जीवितहानी झाली नसली तरी इस्रायलच्या सीमाभागात काही प्रमाणात घबराट निर्माण झाली होती. हमासच्या या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराने गाझात कारवाई सुरू केली. यात इस्रायली लढाऊ विमाने, हेलिकाप्टर्स तसेच रणगाडे सहभागी झाले होते.या हल्ल्यात गाझापट्टीतील हमासचे टनेल नेटवर्क नष्ट केल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. रविवारी पहाटेपर्यंत गाझापट्टीतील रफाह, खान युनूस आणि बैत हनून या शहरांवर इस्रायलचे हे हल्ले सुरू होते. यानंतर इस्रायलने आपल्या सुरक्षा यंत्रणांसाठी अलर्ट जारी केला आहे.

हवाई कारवाई

हमासने इस्रायलच्या कारवाईवर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. पण इस्रायलकडून ही कारवाई सुरू होण्याच्या काही तास आधी हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचे वरिष्ठ कमांडर इराणमध्ये भेट झाली होती. वेस्ट बँकमधील इस्रायलच्या वस्त्या उद्‍ध्वस्त करण्यावर तसेच इस्रायलविरोधात आघाडी उघडण्यावर एकमत झाल्याची बातमी इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केली. वर्षभरापूर्वी इस्रायलच्या कारवाईत गाझातील इस्लामिक जिहादचा वरिष्ठ कमांडर ‘बहा अबू अल-अता’ ठार झाला होता. त्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इस्लामिक जिहादच्या संघटनेने हे हल्ले चढविल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये हमासने इराण तसेच तुर्कीबरोबरील सहकार्य वाढविले आहे. आतापर्यंत हमास आणि इराणमध्ये जोरदार सहकार्य सुरू होते. पण गेल्या काही महिन्यांपासून हमासने तुर्कीबरोबरच्या सहकार्याला प्राधान्य दिले आहे. हमासने तुर्कीमध्ये सायबर कमांड सुरू केली असून तुर्कीच्या एर्दोगन सरकारकडून हमासला भरीव सहाय्य पुरविले जात आहे. या सायबर कमांडचा वापर करुन हमास इस्रायल तसेच इतर आखाती देशांवर सायबर हल्ले चढवू शकतो, अशी चिंता इस्रायलचे लष्करी कमांडर व्यक्त करीत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info