इस्रायल आणि इराण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे – अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा इशारा

वॉशिंग्टन – इस्रायलने सिरियातील इराणच्या ठिकाणांवर चढविलेल्या हवाई हल्ल्यांनंतर इस्रायल आणि इराणमधील तणाव विकोपाला गेला आहे. येत्या काळात इस्रायलने सिरियातील इराणच्या ठिकाणांवर नव्याने हल्ले चढविले तर इराणकडून त्याला प्रत्युत्तर मिळेल आणि या क्षेत्रात युद्धाचा भडका उडेल, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख ‘डॅन कोट्स’ यांनी दिला. अमेरिकी सुरक्षा यंत्रणांप्रमाणे आखातातील विश्‍लेषकही सातत्याने हाच दावा करीत आहेत.

इस्रायल आणि इराण, तणाव, डॅन कोट्स, शियापंथिय, रॉकेट हल्ले, अमेरिका, सिरिया, लेबेनॉन

अमेरिकेच्या सुरक्षा व गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी सिनेटच्या समितीसमोर माहिती देताना आखातात भडकू शकणार्‍या युद्धाची भयावह शक्यता वर्तविली. अमेरिकेतील १६ गुप्तचर यंत्रणांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारावर कोट्स यांनी हा दावा केला. ‘सिरियातील इराण व हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर इस्रायलने आतापर्यंत चढविलेल्या हल्ल्यांना इराणने प्रत्युत्तर दिलेले नाही. पण येत्या काळात इस्रायलने इराणवर नवे हल्ले चढविले तर इराण आपल्या क्षेपणास्त्रांचे हल्ले इस्रायलवर चढविल’, असे कोट्स म्हणाले.

इस्रायलच्या हल्ल्यानंतरही इराण सिरियामध्ये लष्करी तळ ठोकण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट होते, याकडे कोट्स यांनी लक्ष वेधले. सिरियामध्ये तळ प्रस्थापित करून इराणला लेबेनॉन, सिरिया, इराक असा शियापंथिय हल्लेखोरांचे नेटवर्क उभारायचे आहे, असे कोट्स यांनी सांगितले. इराणचे हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलने हवाई हल्ले चढविले खरे. पण या हल्ल्यानंतरही इराणचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकलेले नाही, अशी चिंता कोट्स यांनी व्यक्त केली.

इस्रायल आणि इराण, तणाव, डॅन कोट्स, शियापंथिय, रॉकेट हल्ले, अमेरिका, सिरिया, लेबेनॉनकोट्स यांचा हा निष्कर्ष प्रसिद्ध होण्याच्या काही तास आधी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रिव्हलिन यांनीही इराण इस्रायलवर हल्ले चढवू शकतो, असे म्हटले होते. गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरियात चढविलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले होते. पण गोलान टेकड्यांच्या सीमाभागात कार्यान्वित असलेल्या ‘आयर्न डोम’ने इराणचे हे हल्ले उधळून लावले होते. पण पुढच्या वेळी इराण इस्रायलवर अधिक तीव्र हल्ले चढविणार असल्याचे स्पष्टपणे संकेत मिळू लागले आहेत.

इराणच्या लष्करी अधिकार्‍यांनी याबाबत केलेली विधाने हे संकेत देत आहेत. सिरियावरील इस्रायलचे हल्ले रोखायचे असतील, तर इराणला इस्रायलवर हल्ला चढवावे लागतील, असा दावा इराणचे अधिकारी करीत आहेत. वेगळ्या शब्दात हे अधिकारी इराणच्या नेतृत्त्वाकडे इस्रायलवर हल्ल्यासाठी परवानगी मागत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

एकदा का इस्रायल व इराणमध्ये युद्ध पेटले तर ते थांबविणे दुसर्‍या कुठल्याही देशाला शक्य होणार नाही, असे आखाती देशांमधील विश्‍लेषकांनी बजावले आहे. तसेच इस्रायल व इराणमधील युद्ध केवळ या दोन देशांपुरते मर्यादित राहणे शक्यच नाही, यात हिजबुल्ला व पर्यायाने लेबेनॉन तसेच गाझापट्टीतील हमास व इतर संघटना आणि देश ओढले जातील. त्यामुळे या युद्धाचे परिणाम भयंकर असतील, याकडेही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info