अमेरिकेच्या युरोपातील तैनातीला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियन बॉम्बर्सची आर्क्टिक क्षेत्रात गस्त

अमेरिकेच्या युरोपातील तैनातीला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियन बॉम्बर्सची आर्क्टिक क्षेत्रात गस्त

मॉस्कोे – अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाविरोधात आक्रमक धोरण राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर रशियानेही त्याविरोधात वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नॉर्वेतील हवाईतळावर ‘बी-१ बॉम्बर्स’ तैनात करण्याचे आदेश दिले होते. अमेरिकेची ही विमाने युरोपात दाखल होण्यापूर्वीच रशियाने आपल्या प्रगत बॉम्बर्सची आर्क्टिक क्षेत्रातील गस्त वाढविली आहे. काही दिवसांपूर्वी रशियन बॉम्बर्सनी आर्क्टिक क्षेत्रातील आईसलॅण्ड व नॉर्वेच्या हवाईहद्दीनजिक घिरट्या घातल्याची माहिती समोर आली आहे.

रशियन बॉम्बर्स, गस्त, बी-१ बॉम्बर्स, आर्क्टिक, तैनातीला प्रत्युत्तर, रशिय, पाणबुड्या, TWW, Third World War

या आठवड्यात, अमेरिकेची चार ‘बी-१ बॉम्बर्स’ विमाने नॉर्वेतील ‘ऑरलँड’ तळावर दाखल होणार आहेत. या विमानांबरोबरच २०० जवानांची तुकडीही नॉवेतील तळावर तैनात करण्यात येणार आहे. बॉम्बर्स विमानांच्या तैनातीची पूर्वतयारी करण्यासाठी हवाईदलाची छोटी तुकडी नॉर्वेत आधीच दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेने स्वतंत्ररित्या नॉर्वेतील तळांवर ‘बॉम्बर्स’ विमाने तैनात करण्याची ही पहिलीच वेळ ठरते.

रशियन बॉम्बर्स, गस्त, बी-१ बॉम्बर्स, आर्क्टिक, तैनातीला प्रत्युत्तर, रशिय, पाणबुड्या, TWW, Third World War

अमेरिकी बॉम्बर्सच्या तैनातीच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने आपली ‘टीयु-१६०’ ही प्रगत बॉम्बर्स नॉर्वे व आईसलॅण्डच्या हद्दीनजिक धाडल्याचे उघड झाले. या बॉम्बर्सबरोबरच ‘मिग-३१’ ही लढाऊ विमानेदेखील मोहिमेसाठी पाठविली होती, अशी माहिती रशियन सूत्रांकडून देण्यात आली आहे. रशियाने यापूर्वी आर्क्टिक क्षेत्रात बॉम्बर्स व लढाऊ विमानांच्या सहाय्याने गस्त घातली असली तरी नॉर्वे-आईसलँण्डमधील हद्दीत बॉम्बर्स धाडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते.

रशियाची ही तैनाती अमेरिकेला इशारा देण्याच्या हालचालींचा भाग असल्याचे मानले जाते. अमेरिकेने नॉर्वेत बॉम्बर्स तैनात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रशियाच्या परराष्ट्र विभागाने दिलेली प्रतिक्रिया याला दुजोरा देणारी ठरते. ‘रशियाच्या सीमांवर तणाव वाढत असताना आम्ही शांत राहण्याची भाषा बोलू शकत नाही. रशियाविरोधात लष्करी कारवाईसाठी युरोपिय देशांमध्ये तालीम घेण्यासाठी मैदान तयार करण्यात येत आहे’, असा दावा परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी केला होता.

रशियाने गेल्या काही वर्षात आर्क्टिकमधील संरक्षणतळांची संख्या व त्यावरील तैनाती मोठ्या प्रमाणात वाढवली होती. रशियन लढाऊ विमाने व पाणबुड्यांचा वाढता वावर युरोपिय देशांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. मात्र ही सर्व तैनाती स्वसंरक्षणासाठी असल्याचा खुलासा रशियाकडून वारंवार करण्यात आला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info