चीनला रोखण्यासाठी अमेरिकी नौदलाचा ‘फ्युचर फॉरवर्ड प्लॅन’ – संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांची घोषणा

वॉशिंग्टन – अमेरिकी संरक्षणदलासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्र हे मुख्य प्राधान्य क्षेत्र असून, चीन हाच अमेरिकेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. याकडे लक्ष वेधत अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी, चीनच्या सागरी क्षेत्रातील कारवाया रोखण्यासाठी अमेरिकी नौदल ‘फ्युचर फॉरवर्ड’ योजना राबविणार असल्याची घोषणा केली. या योजनेनुसार, अमेरिकी नौदलातील युद्धनौका व जहाजांची संख्या ३५५ पर्यंत वाढविण्यात येणार असून त्यात मानवरहीत व स्वयंचलित युद्धनौका, पाणबुड्या आणि प्रगत ड्रोन्सचा समावेश असणार आहे. सध्या अमेरिकेच्या नौदलातील युद्धनौका व जहाजांची संख्या २९३ असून संख्याबळाच्या तुलनेत ते चिनी नौदलापेक्षा मागे आहे. चीनच्या नौदलात ३५० युद्धनौका व जहाजे असल्याचा अहवाल अमेरिकेच्या संरक्षण विभागाने नुकताच जाहीर केला होता.

बुधवारी कॅलिफोर्नियात ‘रँड कॉर्पोरेशन’ या अभ्यासगटाच्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री एस्पर यांनी नौदलाच्या महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती दिली. ‘भविष्यातील अमेरिकी नौदल अधिक प्रभावी व संतुलित असेल. समुद्रावरून, समुद्राखालून आणि हवेतून आक्रमक हल्ले चढविण्याची क्षमता या दलाकडे असेल. येणाऱ्या काही वर्षांमध्ये तसेच दशकांमध्ये सागरी क्षेत्रातील युद्ध कसे लढले जाईल याची दिशा या योजनेतून मिळेल’, असे सांगून अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी नवी योजना ‘गेम चेंजर’ असल्याचा दावा केला.

२०२१ सालच्या संरक्षणखर्चात नौदलासाठी २०७ अब्ज डॉलर्सची तरतूद अपेक्षित आहे. संरक्षणमंत्री एस्पर यांच्या ‘फ्युचर फॉरवर्ड प्लॅन’नुसार, त्यातील जास्तीत जास्त वाटा नव्या व प्रगत युद्धनौका तसेच पाणबुड्यांच्या उभारणीसाठी देण्यात येईल. एस्पर यांनी आपल्या योजनेत नव्या विनाशिका, ‘अँम्फीबियस शिप्स’, ‘अनमॅन्ड शिप्स’, ‘ऑटोनॉमस वॉरशिप्स’ यांचा समावेश असल्याचे संकेत दिले आहेत. येणाऱ्या काळात नौदलात अधिकाधिक मानवरहीत व स्वयंचलित युद्धनौका तसेच यंत्रणा सक्रिय असतील, असा दावाही त्यांनी केला. अमेरिकी नौदलासाठी ‘सी हंटर’सारखे प्रगत ड्रोन शिप विकसित करण्यात आले असून हे ड्रोन शिप तब्बल दोन महिन्यांहुन अधिक काळ टेहळणी करु शकते, अशी माहिती संरक्षणमंत्र्यानी दिली.

यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीत संरक्षणखर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली होती. तत्कालीन संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी नौदलासह इतर संरक्षणदलांच्या खर्चात जवळपास १५० अब्ज डॉलर्सहून अधिक कपात करण्याचे आदेश दिले होते. त्यात नौदलासाठीच्या अनेक मोठ्या योजनांचा समावेश होता. सध्याच्या काळात अमेरिकी नौदल संख्याबळात चीनच्या मागे पडण्यामागे ही कपात कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर, एस्पर यांनी मांडलेली योजना लक्ष वेधून घेणारी ठरते.

अमेरिकी नौदलासाठी आखण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना सागरी क्षेत्रात चीनवर वर्चस्व कायम ठेवण्यात महत्वाचे योगदान देईल, अशी ग्वाही संरक्षणमंत्री एस्पर यांनी दिली आहे. त्यासाठी २०४५ सालापर्यंत नौदलासाठी अब्जावधी डॉलर्सची अतिरिक्त तरतूद केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकी नौदलासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्राला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत असून, त्यामागे चीनबरोबर या क्षेत्रातील सत्तास्पर्धा हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे एस्पर यांनी स्पष्ट केले.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info