ब्रुसेल्स – रशियाने गेल्या वर्षी आयोजित केलेला ‘झॅपड’ युद्धसराव युरोपविरोधातील युद्धाची रंगीत तालीम असल्याचा इशारा विविध विश्लेषकांकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रशियाचा मुकाबला करण्यासाठी नाटोनेही आक्रमक युद्धसरावांचा निर्णय घेतला असून रशियन सीमेनजिक असणार्या पोलंड व नॉर्वे या देशांमध्ये हे सराव आयोजित करण्यात येणार आहेत. पोलंडमध्ये होणार्या ‘अॅनाकोंडा २०१८’ मध्ये तब्बल एक लाख सैनिक सहभागी होणार असून नॉर्वेत होणार्या ‘ट्रायडंट जॉईनिंग’मध्ये ४५ हजारांहून अधिक जवान सहभागी होणार आहेत.
अमेरिकेच्या ‘मरिन कॉर्प्स’चे प्रमुख जनरल रॉबर्ट नेलर यांनी नॉर्वेत होणार्या ‘ट्रायडंट जॉईनिंग’ युद्धसरावाबद्दल नुकतीच माहिती दिली. ‘ऑक्टोबर महिन्यात होणार्या या युद्धसरावात ‘अॅम्फिबियस’ संघर्षाच्या सरावावर भर देण्यात येणार आहे. अशा प्रकारे करण्यात येणारा शीतयुद्धानंतरचा हा सर्वात मोठा युद्धसराव असेल’, असा दावा जनरल नेलर यांनी केला. हा सराव रशियन सीमेनजिक असेल, असे संकेतही अमेरिकी अधिकार्याने दिले.
नॉर्वे हा ‘नाटो’च्या संस्थापक सदस्य देशांपैकी एक असून गेल्या काही वर्षात नॉर्वेने आपल्या संरक्षणसज्जतेवर भर देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेकडून ‘एफ-३५’ ही ‘फिफ्थ जनरेशन फायटर्स’ खरेदी करण्याचा करार नॉर्वेने यापूर्वीच केला असून २०१७ साली पहिले ‘एफ-३५’ नॉर्वेत दाखल झाले आहे. त्यापाठोपाठ अमेरिकी मरिन्सची तुकडी तैनात ठेवण्याच्या योजनेलाही नॉर्वेने मंजुरी दिली आहे. ‘ट्रायडंट जॉईनिंग’ हा सराव नॉर्वेनजिकच्या सागरी क्षेत्रात हालचाली वाढविणार्या रशियाला योग्य इशारा देण्याच्या धोरणाचा भाग मानला जातो.
नॉर्वेत होणार्या युद्धसरावापूर्वी पोलंडमध्ये ‘अॅनाकोंडा २०१८’ युद्धसरावाचे आयोजन करण्यात येणार असून त्यात तब्बल एक लाखाहून अधिक सैनिक सहभागी होणार आहेत. पोलंडसह नाटो सदस्य देश व नाटोचे भागीदार देशही युद्धसरावात सहभागी होणार आहेत. पोलंडकडून या सरावासाठी सुमारे २० हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. त्याव्यतिरिक्त या सरावात पाच हजार सशस्त्र वाहने, रणगाडे, तोफा तसेच १५० लढाऊ विमाने व ४५ युद्धनौका सहभागी होणार आहेत. लष्कर, हवाईदल व नौदलाबरोबरच ‘स्पेशल फोर्सेस’चा सहभाग हे या युद्धसरावाचे वैशिष्ट्य असणार आहे.
(Courtesy: www.newscast-pratyaksha.com)