वॉशिंग्टन – ‘अमेरिकेचे सहकारी देश इराणबरोबरील अणुकराराच्या प्रेमात आहेत. त्यांच्यासाठी अमेरिकेला या अणुकरारात रहायचे असेल तर ठीक आहे. पण जर अमेरिकेने या अणुकरारातून माघार घेतली, तर त्यामुळे काही जगाचा अंत होणार नाही’, अशा शब्दात अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री काँडोलिझा राईस यांनी इराणबरोबरील अणुकराराच्या मुद्द्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वीकारलेल्या भूमिकेचे समर्थन केले.
‘अमेरिकेने इराणबरोबरच्या अणुकरारातून माघार घेऊ नये यासाठी युरोपिय मित्रदेश जोरदार प्रयत्न करीत आहेत. आठवड्याभरापूर्वी अमेरिकेच्या दौर्यावर आलेल्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी हा अणुकरार टिकविण्याबाबतचे पर्याय अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सुचविले. हा करार इराणच्या अणुकार्यक्रमाला रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा अमेरिकेचे सहकारी देश करीत आहेत’, याकडे राईस यांनी लक्ष वेधले.
‘इराणबरोबर आर्थिक सहकार्यात गुंतल्यामुळे अमेरिकेच्या मित्रदेशांना या कराराबद्दल प्रेम वाटत आहे’, असा टोला अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला. ‘त्यांच्यासाठी अमेरिका अणुकरारात राहण्याचा निर्णय घेतला तर ते ठीक आहे. पण या अणुकरारापासून अमेरिकेला काही मिळणार नाही. तसेच या अणुकरारातून माघार घेतल्यामुळेही काही फरक पडणार नाही’, असे सूचक उद्गार राईस यांनी अमेरिकेतील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काढले आहेत.
त्याचवेळी माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कार्यकाळात इराणबरोबर झालेल्या करारावर माजी परराष्ट्रमंत्री राईस यांनी ताशेरे ओढले. ‘इराणला आर्थिक सवलत देणार्या तसेच निर्बंध शिथिल करणार्या आणि अणुकार्यक्रमावरील पकड ढिली करणार्या या करारावर मी कधीही स्वाक्षरी केली नसती’, असे सांगून राईस यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली.
इराणने अणुकार्यक्रम सुरू केल्यापासून त्याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली होती. इराण या अणुकार्यक्रमाच्या आड अण्वस्त्रनिर्मिती करीत असल्याचा दाट संशय अमेरिकेच्या प्रत्येक प्रशासनाला होता. तरी देखील ओबामा प्रशासनाने इराणबरोबर अणुकरार केला, यावर माजी परराष्ट्रमंत्री राईस यांनी आश्चर्य व्यक्त केले.
‘इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीबाबतचे जगासमोर मांडलेले पुरावे इराणला कोंडीत पकडण्यासाठी पुरेसे आहेत. इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत नेहमीच जागतिक समुदायाची फसवणूक केली होती. इस्रायली पंतप्रधानांनी सादर केलेल्या पुराव्यांमुळे हे पुन्हा सिद्ध झाले असून २०१५ साली झालेला करारही असाच होता’, असे सांगून पाश्चिमात्य देश इराणच्या अणुकार्यक्रमाची चाचपणी करण्यात कमी पडल्याची टीका राईस यांनी केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आक्रमक आघाडी उघडली असून सिरिया, येमेन, अणुकार्यक्रम, हिजबुल्लाह या सर्व मुद्द्यांवर इराणला लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी इराणवर निर्बंधही लादले असून अणुकार्यक्रमातून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या भूमिकेला सौदी अरेबिया व इस्रायलने समर्थन दिले असून इराणविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, इराणला ‘९/११’ हल्ल्यासाठी ‘अल कायदा’ला सहाय्य करण्याबाबत दिलेला निकाल अमेरिका व इराणमधील तणाव अधिक चिघळवणारा ठरू शकतो.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/991937942141648896 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/389551664786657 |