अमेरिका लवकरच ‘स्कायबॉर्ग’ची चाचणी घेणार

अमेरिका लवकरच ‘स्कायबॉर्ग’ची चाचणी घेणार

वॉशिंग्टन – अमेरिकेने ‘रोबोट वॉर’च्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मानवरहित टेहळणी विमाने, विनाशिका आणि पाणबुड्यांच्या निर्मिती व चाचणीनंतर अमेरिकेने मानवरहित लढाऊ विमानांच्या चाचणीची तयारी केली आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ (एआय) आणि ‘ऑटोनॉमी अल्गोरिदम्स’वर आधारीत या मानवरहित लढाऊ विमान अर्थात ‘स्कायबॉर्ग’ची चाचणी लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती अमेरिकेतील आघाडीच्या मासिकाने प्रसिद्ध केली. या मानवरहित लढाऊ विमानाची चाचणी भविष्यात अमेरिकी हवाईदलाच्या सामर्थ्यात वाढ करणारी ठरेल, असा दावा या मासिकाने केला आहे.

अमेरिकेच्या हवाईदलाच्या ‘रिसर्च लॅबोरटरी’ने मानवरहित लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे. या विमानाच्या ‘प्रोटोटाईप’ची चाचणी येत्या काही दिवसात घेण्यात येईल. कॅलिफोर्नियाच्या ‘कर्न कौंटी’ येथील एडवर्ड्स हवाईतळावर ही चाचणी पार पडेल. अमेरिकेच्या हवाईदलाच्या प्रवक्त्या ‘कॅरा बॉसी’ यांनी यासंबंधी माहिती दिली. या मानवरहित लढाऊ विमान, ‘स्कायबॉर्ग’ची चाचणी छोट्या स्वरूपात केली जाईल.

पण एखाद्या लढाऊ विमानासारखे, युद्धपरिस्थितीचा थरार निर्माण करणारे वेगवान उड्डाण ‘स्कायबॉर्ग’ करणार असल्याचे बॉसी म्हणाल्या. या चाचणीत नियोजित उद्दिष्ट्ये पार पाडल्यानंतर ‘स्कायबॉर्ग’च्या पुढील चाचण्यांचा दर्जा उंचावण्यात येईल, असे बॉसी यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून हवाईदल व संबंधित संघटना ‘स्कायबॉर्ग’च्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. मार्च महिन्यात ‘स्कायबॉर्ग’बाबतची पहिली माहिती उघड करण्यात आली होती.

अमेरिका तयार करीत असलेल्या मानवरहित लढाऊ विमानांच्या ताफ्यातील ‘स्कायबॉर्ग’ लढाऊ विमान आघाडीचे असेल, असा दावाही अमेरिकेतील लष्करी विश्‍लेषक देत आहेत. ‘एआय’ आणि ‘ऑटोनॉमी अल्गोरिदम’वर आधारित असल्यामुळे स्कायबॉर्ग विमान युद्धकाळात किंवा मोहिमेवरील निर्णय आपणहून घेऊ शकेल, असेही अमेरिकी मासिकाचे म्हणणे आहे. पुढील काही महिने ‘स्कायबॉर्ग’ वेगवेगळ्या चाचण्यांना सामोरे जाणार असून २०२३ साली सदर मानवरहित लढाऊ विमान अमेरिकी हवाईदलाच्या ताफ्यात सहभागी होईल.

मार्च महिन्यात अमेरिकेच्या हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी ‘विल रॉपर’ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत ‘स्कायबॉर्ग’ची चाचणी घेण्यात येईल. पण ‘स्कायबॉर्ग’बरोबर अमेरिकी हवाईदल इतरही मानवरहित विमानांची चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये ‘कार्टोस ‘एक्सक्यू-५८ए वल्करी’ स्टेल्थ लढाऊ विमान, बोईंग कंपनीचे ‘क्यूएफ-१६’ मानवरहित लढाऊ विमान आणि ‘बीक्यूएम-१६७ स्कीटर’ हल्लेखोर ड्रोन यांचीही चाचणी होणार आहे. यापैकी ‘वल्करी’ची मार्च महिन्यात चाचणी घेणार आहे. तर अमेरिकेच्या वायुसेनेतील जुन्या ‘एफ-१६’ विमानांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या मानवरहित लढाऊ विमानाची पहिली चाचणी २०१३ साली घेण्यात आली होती.

दरम्यान, ‘एआय’च्या सहाय्याने चीन व रशियानेदेखील मानवरहित ड्रोन्स, रणगाड्यांच्या निर्मितीत आघाडी घेतली आहे. चीनच्या स्वार्म ड्रोन्सनी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात सराव केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेने ‘स्कायबॉर्ग’ व इतर मानवरहित लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्ये घेतलेली आघाडी महत्त्वाची ठरते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info