पॅरिस – इराणच्या हल्ल्याचा धोका बळावल्याने अमेरिकेच्या आखातातील मित्रदेशांमध्ये ‘मिसाईल शिल्ड’ सक्रिय करण्यासाठी वेगाने पावले उचलला, अशी आग्रही भूमिका अमेरिकी संसदेने घेतली आहे. संसदेच्या समितीने संरक्षणखर्चाबाबतच्या प्राथमिक मसुद्यात याचा उल्लेख करताना ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’ व ट्रम्प प्रशासनाला आवाहन केले आहे.
अमेरिकेने २०१२ सालापासून इराणच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू असलेल्या योजनेचा भाग म्हणून ‘गल्फ मिसाईल शिल्ड’ची तयारी सुरु केली होती. तत्कालिन संरक्षणमंत्री लिऑन पॅनेट्टा व अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’चे प्रमुख जनरल जेम्स मॅटिस यांनी आखाती देशांशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’चा भाग असलेल्या देशांमध्ये ‘मिसाईल शिल्ड’साठी आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू झाली होती.
सध्या कौन्सिलचे सदस्य असलेल्या देशांमध्ये ‘गल्फ मिसाईल शिल्ड’चा भाग असलेल्या प्रगत रडार यंत्रणा तसेच ‘इंटरसेप्टर मिसाईल्स’ तैनात करण्यात आली आहे. मात्र यांना एकत्रित जोडणारी व्यवस्था अद्यापही तयार झाली नसल्याने ‘गल्फ मिसाईल शिल्ड’ची तैनाती लांबणीवर पडली. गेल्या काही महिन्यांपासून ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’चे सदस्य असणार्या कतारवर इतर देशांनी बहिष्कार टाकला आहे. यामुळे ‘मिसाईल शिल्ड’सारख्या अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील योजनेला धक्का बसल्याचे दिसत आहे.
अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस आर्मड् सर्व्हिसेस कमिटी’ने आपल्या प्राथमिक मसुद्यात ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’च्या सदस्यांना इराणविरोधात एकजूट कायम राखण्याचे आवाहन केले. इराणकडे मोठ्या प्रमाणावर छोट्या तसेच मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे असून आखाती देश या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’च्या सदस्य देशांनी राजनैतिक, सुरक्षाविषयक तसेच आर्थिक संबंध सामान्य करण्यावर भर द्यावा व हीच गोष्ट अमेरिकेच्याही हिताची ठरेल, असा उल्लेख मसुद्यात करण्यात आला आहे.
आखाती देशांमध्ये सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीने अमेरिकेची ‘थाड’ ही प्रगत क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा खरेदी केली असून कतारमध्ये ‘एक्स बँड रडार’ तैनात करण्यात आले आहेत.
इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:
https://twitter.com/WW3Info/status/994973340795224064 | |
https://www.facebook.com/WW3Info/photos/a.393165984425225 |