पॅरिस – युरोपने अमेरिकेला आर्थिक क्षेत्रातील जगाचा पोलीस म्हणून स्वीकारण्याची गरज नसून युरोप अमेरिकेचे मांडलिक राज्य बनलेले नाही, असा खरमरीत इशारा फ्रान्सने दिला आहे. इराणच्या अणुकराराच्या मुद्यावर रशिया, युरोपिय देश, तुर्की यासारख्या देशांनी अमेरिकेच्या निर्णयाला जोरदार विरोध केला असून स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी इराणच्या अणुकरारातून बाहेर पडणे म्हणजे युद्धाची घोषणा ठरु शकते, असे यापूर्वीच बजावले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणच्या अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ट्रम्प यांच्या या निर्णयापूर्वी ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या देशांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना त्यांचे धोरण बदलण्याचे आवाहन केले होते. मात्र ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून इराणच्या अणुकरारातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटत असून इस्रायल, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरात वगळता इतर प्रमुख देशांनी अणुकरार कायम रहावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शुक्रवारी फ्रान्सच्या अर्थमंत्र्यांनी आक्रमक वक्तव्ये करून युरोप अमेरिकेसमोर झुकणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. ‘युरोपने अमेरिकेला जगाचा आर्थिक पोलीस म्हणून स्वीकारण्याची गरज नाही. युरोपने अमेरिकेच्या पदराला लटकून त्यांचे मांडलिक राज्य बनण्याची गरज नाही. युरोपने आपले आर्थिक हितसंबंध जपून इराणशी व्यापार पुढे कायम ठेवण्याबाबत निर्णय घ्यायला हवा’, अशा शब्दात अर्थमंत्री ब्रुनो ले मेर यांनी युरोपला स्वतंत्र भूमिका घेण्याचे आवाहन केले.
फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-वेस ले ड्रिअन यांनीही इराणवर निर्बंध लादण्याचा अमेरिकेचा निर्णय कधीही स्वीकारण्यात येणार नसल्याचा इशारा दिला. इराणबरोबरील आपले हितसंबंध जपण्यासाठी युरोपिय देश सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी मात्र या मुद्यावर सावधगिरी बाळगण्याची भूमिका घेतली असून अमेरिकेबरोबरील भागीदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही, असे स्पष्ट केले.
युरोप अमेरिकेविरोधात आक्रमक संकेत देत असतानाच रशिया व तुर्की यासारख्या देशांनीही इराणच्या मुद्यावरील अमेरिकेचा निर्णय धुडकावला आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी या मुद्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केल्याचे समोर आले. यावेळी अमेरिकेचा निर्णय चुकीचा असून इराणबरोबरील करार पुढे कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुर्कीच्या वाणिज्यमंत्र्यांनीही इराणबरोबरील व्यापार कायम ठेवण्याचे संकेत दिले असून ‘मजबूत इराण, मजबूत तुर्की’ अशा शब्दात इराणबरोबरील संबंधांचे समर्थन केले.
दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी इराण व इस्रायलमध्ये झालेल्या संघर्षावर प्रतिक्रिया दिली असून इराणला आखातात नवा तणाव नको आहे, असे वक्तव्य केले. त्याचवेळी अणुकराराबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरून समर्थन मिळविण्यासाठी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ शनिवारपासून आंतरराष्ट्रीय दौर्यावर जात असून रशिया, चीन व युरोपला भेट देणार आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |