जेरूसलेम/वॉशिंग्टन – ‘७० वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरि ट्रुमन यांनी सर्वप्रथम इस्रायलला देश म्हणून मान्यता दिली होती. आजच्या दिवशी इस्रायलची राजधानी जेरूसलेममध्ये अमेरिकेचा दूतावास सुरू होत आहे’, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी इस्रायलचे अभिनंदन केले. खरेतर इस्रायलने १९४८ साली आपल्या स्थापनेबरोबर जेरूसलेम हीच आपली राजधानी असल्याचे घोषित केले होते. पण ही साधीशी बाब स्वीकारण्यासाठी ७० वर्षांचा कालावधी जावा लागला, याकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लक्ष वेधले.
रोमानिया, झेक प्रजासत्ताक, पॅराग्वे, होंडुरास, ग्वाटेमाला, बोलिव्हिया या देशांचा अपवाद वगळता जगभरातील सर्वच प्रमुख देश अमेरिकेने जेरूसलेमबाबत घेतलेल्या या निर्णयावर टीका केली आहे. तर काही इस्लामधर्मिय देश आणि पॅलेस्टिनींचे नेते या निर्णयाचे भयंकर पडसाद उमटतील, अशा धमक्या देत आहेत. यामुळे सोमवारी होणार्या अमेरिकी दूतावासाच्या जेरूसलेममधील उद्घाटन सोहळ्याकडे जगभरातील निरिक्षकांचे लक्ष लागले होते. इस्रायली प्रमाणवेळेनुसार सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हिडिओवरून संदेश देऊन आपल्या निर्णयाचे समर्थन केले.
‘इतर देशांप्रमाणे इस्रायल हा सार्वभौम देश असून त्यालाही एक स्वत:ची राजधानी आहे’, असे ट्रम्प म्हणाले. तसेच जेरूसलेममध्येच इस्रायलची संसद, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांची निवासस्थाने आहेत, असे सांगून प्रत्यक्षात हीच इस्रायलची राजधानी असल्याचे ट्रम्प यांनी लक्षात आणून दिले. आपण केवळ यावर शिक्कामोर्तब करून जेरूसलेमचा हा दर्जा अधिकृत केला, असे संकेत देऊन ट्रम्प यांनी हे ७० वर्षांपूर्वीच घडायला हवे होते, असे मत व्यक्त केले. तसेच ज्यूधर्मियांसाठी जेरूसलेमचे फार मोठे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे, याकडेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले.
मात्र अमेरिकेने हा निर्णय घोषित केला असला, तरी जेरूसलेममधील ‘टेंपल माऊंट’ आणि ‘हराम अल-शरिफ’ या नावाने ओळखले जाणार्या धर्मस्थळाची स्थिती बदलणार नाही, असा खुलासाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. तसेच अमेरिका इस्रायल, पॅलेस्टाईन आणि शेजारी देशांसाठी सहकार्याचा हात पुढे करीत असून अमेरिका शांतीप्रक्रियेसाठी वचनबद्ध आहे, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या क्षेत्रात शांतता नांदावी अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करीत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यावेळी म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेऊन पॅलेस्टिनी जनतेबरोबरच जगभरातील इस्लामधर्मियांनाही दुखावल्याची टीका जगभरातून केली जात आहे. यावर जहाल प्रतिक्रिया उमटत असून पॅलेस्टिनी जनता गाझापट्टी व वेस्ट बँक येथे उग्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त करीत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हा निर्णय म्हणजे सर्वसामान्य बाब असल्याचे सांगत असले तरी त्याला फार मोठे प्रतिकात्मक महत्त्व आहे, असा दावा काही विश्लेषकांनी केला आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे या निर्णयासाठी आभार मानले. ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज ऐतिहासिक घोषणा केली असून अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासारखा मित्र जगात दुसरा कुठेही नाही’, असे नेत्यान्याहू म्हणाले. तसेच जेरूसलेम हे इस्रायलचेच असून आम्ही इथून कुठेही जाणार नसल्याचा इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिला.
दरम्यान, अमेरिकेपाठोपाठ रोमानिया, झेक प्रजासत्ताक, पॅराग्वे, होंडुरास, ग्वाटेमाला, बोलिव्हिया, हे देश जेरूसलेममध्ये आपले दूतावास हलविणार आहेत. येत्या काही तासात ही प्रक्रिया सुरू होईल.
पॅलेस्टिनींची ‘जेरुसलेम’ च्या निर्णयाविरोधात संतप्त निदर्शने;
४३ निदर्शक ठार
पॅलेस्टिनींनी इस्त्रायलच्या सीमारेषेवर सुरु केलेल्या निदर्शनांचा सोमवारी भडका उडाला असून इस्त्रायली लष्कराच्या कारवाईत ४३ निदर्शकांचा बळी गेला. गाझापट्टीतील यंत्रणांनी ही माहिती दिली. तर इस्त्रायलच्या सीमारेषेजवळ बॉम्ब पेरणार्या हमासच्या तीन दहशतवाद्यांना ठार केल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे.
सुमारे ४० हजार पॅलेस्टिनी निदर्शकांनी इस्त्रायलच्या सीमारेषेवर धडक देऊन काटेरी कुंपण उखडण्याचा प्रयत्न केला. या निदर्शकांना पांगविण्यासाठी इस्त्रायली लष्कराने केलेल्या कारवाईत १६०० हून अधिक जखमी झाले. यापैकी ७७२ पॅलेस्टिनी इस्त्रायली सैनिकांच्या गोळीबारात जखमी झाल्याचा आरोप पॅलेस्टिनी यंत्रणा करीत आहेत.
गेल्या आठ आठवड्यांपासून सुरु असलेल्या या निदर्शनांमध्ये ७१ हून अधिक जणांचा बळी गेला तर १० हजाराहून अधिक जखमी झाले आहेत. पण ही निदर्शने थांबणार नसून जेरुसलेम इस्त्रायलच्या तावडीतून मुक्त करेपर्यंत निदर्शने सुरु राहणार असल्याचा इशारा हमासने दिला आहे.
दरम्यान, गाझापट्टीपाठोपाठ इस्त्रायलच्या पूर्वेकडील ‘वेस्ट बँक’ च्या सहाहून अधिक शहरांमध्येही इस्त्रायलविरोधात निदर्शने झाली. ही निदर्शने राजधानी जेरुसलेमजवळच्या कालिदाया चौकीपर्यंत नेणार असल्याची घोषणा पॅलेस्टिनी निदर्शकांनी केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info/status/996666450336083968 | |
https://www.facebook.com/WW3Info/posts/394319167643240 |