पाकिस्तान बारा मिनिटात इस्रायल जमीनदोस्त करील – पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याची धमकी

पाकिस्तान बारा मिनिटात इस्रायल जमीनदोस्त करील – पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याची धमकी

वरिष्ठ लष्करी अधिकारीइस्लामाबाद – ‘पाकिस्तान अवघ्या १२ मिनिटात इस्रायलला जमीनदोस्त करील’, अशी धमकी पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या ‘जॉईंट चीफ ऑफ स्टाफ’ कमिटीचे चेअरमन ‘जनरल झुबेर महमूद हयात’ यांनी ही धमकी देत असताना इस्रायल व पाकिस्तानमध्ये हाडवैर असल्याचे ऐतिहासिक दाखलेही दिले आहेत. अमेरिकेने आपला दूतावास जेरूसलेममध्ये हलविल्यानंतर पाकिस्तानातही अमेरिका व इस्रायलच्या विनाश घडविण्याच्या घोषणा कट्टरपंथीयांकडून दिल्या जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जनरल झुबेर महमूद हयात यांनी इस्रायलला दिलेली ही धमकी लक्षवेधी ठरते.

एका मुलाखतीत बोलताना जनरल हयात यांनी इस्रायलला पाकिस्तान अवघ्या १२ मिनिटात जमीनदोस्त करील, असे धमकावले. जर इस्रायलने पाकिस्तानच्या भूमीवर आक्रमण केलेच, तर पाकिस्तान अशी कारवाई करू शकेल, असा दावा जनरल हयात यांनी केला. ही धमकी देत असताना आपण ज्यूविरोधी नसल्याचे जनरल हयात यांनी म्हटले आहे. पण हे सांगत असताना जनरल हयात यांनी इस्रायचले पहिले पंतप्रधान डेव्हिड बिन गुरियन यांनी १९६७ साली एका नियतकालिकात लिहिलेल्या लेखाचा दाखला दिला. या लेखात गुरियन यांनी इस्रायलला पाकिस्तानकडून धोका असल्याचे म्हटले होते.

सदर लेखात गुरियन यांनी पाकिस्तान हा धर्मावर आधारलेला देश असून पाकिस्तानी ज्यूधर्मियांचा द्वेष करतात व ते अरबांवर प्रेम करतात, असे म्हटले आहे. अरबांपेक्षाही अरबांवर प्रेम करणारे इस्रायलसाठी अधिक धोकादायक ठरतील, असे सांगून गुरियन यांनी या लेखात पाकिस्तानच्या विरोधात आत्तापासूनच पावले उचलण्याची मागणी केली होती. तसेच यासाठी भारतीयांचा वापर करता येईल, असेही गुरियन यांनी या लेखात सुचविले होते. जनरल हयात यांनी या लेखाचा दाखला देऊन इस्रायल हा अगदी सुरूवातीपासूनच पाकिस्तानविरोधी देश असल्याचा दावा केला आहे.

वरिष्ठ लष्करी अधिकारीमात्र ज्या लेखाचा दाखला जनरल हयात देत आहेत, तो लेख डेव्हिड बिन गुरियन यांनी लिहिलेलाच नव्हता, असे सांगून काही अभ्यासकांचे या लेखाच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहेत. पण काही दशकांपूर्वी लिहिलेल्या लेखाचा वापर करून जनरल हयात आजच्या इस्रायला धमकावत असल्याचे दिसते. सध्या जेरूसलेमवरून इस्रायल व अमेरिकेच्या विरोधात काही देशांमध्ये वातावरण तापले असून यात पाकिस्तानचाही समावेश आहे. पाकिस्तानात काही ठिकाणी ‘जेरूसलेम’बाबत अमेरिकेने घेतलेल्या निर्णयावर निदर्शने केली जात आहेत.

तर पॅलेस्टिनी निदर्शकांवर कठोर कारवाई करणार्‍या इस्रायलच्या विरोधात पाकिस्तानच्या सरकार व लष्कराने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी या देशातील कट्टरपंथीयांकडून केली जाते. पाकिस्तानला समर्थ नेतृत्त्व मिळाले असते, तर पॅलेस्टिनींवरच्या इस्रायलच्या या कारवाईला नक्कीच उत्तर मिळाले असते, अशी खंतही या देशातील कट्टरपंथीय व्यक्त करीत आहेत. या कट्टरपंथीयांचा रोष कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराकडून प्रयत्न केले जात आहेत. इस्रायलला जमीनदोस्त करण्याची क्षमता पाकिस्तानकडे असल्याचे जनरल हयात यांनी केलेले हे विधान हा याच प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसते आहे.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info/status/998929094501945344
https://www.facebook.com/WW3Info/posts/396858074056016