चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा
बीजिंग – तैवानबरोबरच्या वाढत्या सहकार्यावरुन चीनने अमेरिकेला पुन्हा एकदा धमकावले आहे. ‘अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका तैवानच्या आखातात दाखल झाल्यामुळे तैवानच्या परिस्थितीत काही विशेष फरक पडणार नाही. पण अमेरिकेच्या युद्धनौकेची ही घुसखोरी चीनसाठी चिथावणी ठरेल आणि चीन यावर कारवाई करील’, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी दिला.
गेल्या काही आठवड्यांपासून पाश्चिमात्य माध्यमांमध्ये अमेरिका आणि तैवानमधील लष्करी सहकार्यात वाढ होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. अमेरिका लवकरच तैवानला विनाशिका, प्रगत लढाऊ विमाने पुरविणार असून यासंबंधी अमेरिकेचे अधिकारी लवकरच तैवानला भेट देणार असल्याचा दावा या पाश्चिमात्य माध्यमांनी केला होता.
त्याचबरोबर तैवानबरोबरच्या लष्करी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अमेरिका लवकरच आपली विमानवाहू युद्धनौका तैवानच्या आखातात रवाना करणार असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या तैवानच्या आखातातील अमेरिकन विमानवाहू युद्धनौका दाखल झाल्यास तो चीनसाठी इशारा असेल, असा दावाही या बातमीत करण्यात आला होता. गेल्या काही आठवड्यांमध्ये तैवानच्या सागरी हद्दीजवळून चीनच्या विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिकांच्या वाढत्या गस्तीला चिथावणी देण्यासाठी अमेरिका आपली विमानवाहू युद्धनौका रवाना करीत असल्याचेही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने आपल्या बातमीत म्हटले होते.
यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. ‘तैवानचा प्रश्न हाताळताना अमेरिकेने विशेष दक्षता घ्यावी. कारण अमेरिकेच्या तैवानविषयक भूमिकेमुळे चीनबरोबरचे द्विपक्षीय सहकार्य तसेच तैवानच्या आखातातील शांती आणि स्थैर्य बाधित होणार तर नाही ना, याबाबत अमेरिकेने अधिक सजगता दाखवावी’, असे चुनयिंग यांनी फटकारले. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंधात तैवान हा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला.
चुनयिंग यांच्याआधी चीनच्या ‘अकॅडमी ऑफ मिलिटरी सायन्स’ या लष्करी गटाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल हे ली यांनी सिंगापूर येथे पार पडलेल्या ‘शांग्री-ला’च्या बैठकीतही अमेरिका व तैवान सहकार्यावर नाराजी व्यक्त केली होती. ‘तैवान हा चीनचा सार्वभौम भूभाग असून तैवानबरोबर सहकार्य प्रस्थापित करणे किंवा तैवानबाबत चीनला चिथावणी देणे खपवून घेणार नाही’, अशी धमकी लेफ्टनंट जनरल ली यांनी दिली होती.
तर चीनच्या फूदान विद्यापीठातील ‘सेंटर फॉर अमेरिकन स्टडिज्’ या अभ्यासगटाचे संचालक वू शिन्बो यांनी तैवानच्या आखातात विमानवाहू युद्धनौका रवाना करणे अमेरिका आणि तैवानसाठी योग्य ठरणार नसल्याची टीका केली. ‘तैवानसाठी मदतीचा हात पुढे करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पण अमेरिकेच्या या प्रयत्नांमुळे तैवानवरचे संकट अधिकच वाढेल. आणखी काही देश तैवानबरोबरचे राजनैतिक सहकार्य मोडतील’, असा इशारा शिन्बो यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या बातमीवर तसेच त्यावर चीनने दिलेल्या इशार्यावर अमेरिकेने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण लवकरच तैवानच्या आखातात आपली युद्धनौका रवाना करणार असल्याचे संकेत अमेरिकेने याआधी दिले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |