वॉशिंग्टन/मॉस्को, – ‘‘अंतराळात केवळ अस्तित्व राखणे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी पुरेसे ठरणार नाही. तर अंतराळात वर्चस्व गाजविणे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. यासाठी अमेरिका स्वतंत्र ‘स्पेस फोर्स’ची स्थापना करीत आहे’’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. याची गंभीर दखल रशियाने घेतली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली ही घोषणा म्हणजे इशाराघंटा ठरत असल्याचा दावा रशियाने केला असून याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले आहे.
‘अमेरिकेने अंतराळ क्षेत्रात आघाडीवरच असले पाहिजे. रशिया आणि चीन अंतराळात अमेरिकेच्या पुढे गेलेले परवडणार नाही’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘स्पेस फोर्स’च्या स्थापनेचे महत्त्व अधोरेखित केले. अमेरिकन संरक्षणदलाची सहावी शाखा म्हणून स्पेस फोर्सची स्थापना केली जाईल. अंतराळात अमेरिकेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ही बाब आवश्यक असल्याचे सांगताना, अमेरिकेचे भवितव्य केवळ पृथ्वीपुरते मर्यादित असू शकत नाही, असे उद्गार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काढले. तसेच स्पेस फोर्सची स्थापना अमेरिकेच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांसाठी आवश्यक असल्याची बाब राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लक्षात आणून दिली आहे.
अमेरिकेच्या वायुसेनेप्रमाणे ‘स्पेस फोर्स’देखील स्वतंत्र असेल व स्वतंत्रपणे काम करील, असी माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. फार आधीपासून अमेरिकेने स्पेस फोर्सची स्थापना करावी, अशी मागणी केली जात होती. अंतराळात सामुदायिक संहार करणारी शस्त्रे तैनात न करण्याबाबतचा करार १९६७ साली झाला होता व अमेरिकेने या करारात सहभाग घेतला होता. त्यामुळे अमेरिकेची स्पेस फोर्स या कराराचा भंग करून अंतराळात घातक शस्त्रे तैनात करणार का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. अमेरिकन काँग्रेसच्या काही सदस्यांनी स्पेस फोर्सबाबत आणखी काही वेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या या घोषणेवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा स्पेस फोर्सच्या स्थापनेचा आदेश म्हणजे इशाराघंटा ठरत असल्याचा दावा रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झकारोव्हा यांनी केला. या निर्णयाचे पडसाद उमटल्यावाचून राहणार नाहीत, असे बजावून झकारोव्हा यांनी यामुळे अंतराळाचे लष्करीकरण होईल, असा इशारा दिला. तसेच या निर्णयामुळे सामरिक असमतोल निर्माण होणार असून आंतरराष्ट्रीय सुरक्षेला यामुळे धोका संभवतो, अशी चिंता झकारोव्हा यांनी व्यक्त केली.
रशियाकडेही स्पेस फोर्स आहे. पण त्याचा वापर केवळ संरक्षणासाठी केला जातो व रशियाचे हे पथक शांततेसाठी कार्य करीत असते, असा दावा झकारोव्हा यांनी केला. त्यामुळे रशियाची यासंदर्भातील भूमिका अमेरिकेच्या अगदी विरोधी ठरते, असे सांगून झकारोव्हा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली. रशियन संसदेचे सदस्य ‘व्हिक्टर बोंदारेव्ह’ यांनीही अमेरिकेचा हा निर्णय बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवला असून यामुळे १९६७ सालच्या अंतराळविषयक कराराचा भंग होत असल्याचा दावा केला आहे.
‘अमेरिका या कराराची पर्वा करणार नसेल, तर मग रशियाच काय पण दुसरा कुठलाही देश या कराराचे पालन न करता अशाच स्वरूपाचे निर्णय घेईल. यामुळे अंतराळातील शस्त्रस्पर्धा पेट घेईल’, अशी भीती बोंदारेव्ह यांनी व्यक्त केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |