Breaking News

इस्रायलच्या संसदेत ‘नेशन-स्टेट’ विधेयक संमत – पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष अब्बास आणि अरब लीगची संतप्त टीका

जेरूसलेम/रामल्ला – इस्रायलला ज्यूधर्मियांचे राष्ट्र घोषित करणारे ‘नेशन-स्टेट’ विधेयक इस्रायलच्या संसदेने संमत केले. या विधेयकामुळे इस्रायलमध्ये ज्यूधर्मियांना विशेष दर्जा मिळणार असून पॅलेस्टिनींचा इस्रायलवरील दावा या विधेयकाने खोडून काढला आहे. इस्रायलच्या संसदेत संमत झालेल्या या विधेयकावर पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष अब्बास तसेच अरब-आखाती देशांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून युरोपिय महासंघानेही यावर चिंता व्यक्त केली आहे.

‘नेशन-स्टेट’ विधेयक, संमत, अरब लीग, राष्ट्राध्यक्ष अब्बास, ज्यूधर्मिय, Palestine, टीका, Israel, वेस्ट बँकइस्रायलच्या संसदेत ‘नेशन-स्टेट लॉ’ संबंधित गुरुवारी झालेल्या मतदानात ६२-५५ अशा फरकाने सदर विधेयक संमत करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी नेत्यान्याहू सरकारने संसदेसमोर प्रस्तावित केलेल्या या विधेयकामुळे अनेक मुद्दे निकालात निघाल्याचा दावा केला जातो. सदर विधेयक इस्रायल ही ज्यूधर्मियांची अधिकृत भूमी असल्याचा मुद्दा अधोरेखित करणारा आहे. त्यामुळे या भूभागाचे नागरिक म्हणून ज्यूधर्मियांना विशेष दर्जा या विधेयकाने दिला असून जेरूसलेम तसेच वेस्ट बँकमधील ज्यूधर्मियांच्या वस्त्यांचे बांधकाम देखील यापुढे कायदेशीर ठरणार आहे.

तसेच या विधेयकामुळे ज्यूधर्मियांची ‘हिब्रू’ ही इस्रायलची अधिकृत भाषा ठरून या भाषेला विशेष दर्जा देण्यात आला आहे. याआधी अरबी देखील इस्रायलची अधिकृत भाषा होती. पण नव्या विधेयकामुळे या भाषेला फक्त विशेष दर्जा देण्यात आला आहे. यामुळे इस्रायलमधील अरब नागरिक नाराज झाले आहेत. सदर विधेयक म्हणजे जेरूसलेम ही इस्रायलची राजधानी असल्याच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारे असल्याचा दावा इस्रायली नेते करीत आहेत.

इस्रायलच्या संसदेने संमत केलेल्या या ‘नेशन-स्टेट’ विधेयकावर पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी ताशेरे ओढले. इस्रायलचे सदर विधेयक वंशद्वेषी असून पॅलेस्टिनींविरोधातील कारस्थान असल्याचा आरोप अब्बास यांनी केला. आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलच्या या विधेयकाची दखल घेऊन सदर विधेयक अंमलात आणण्यापासून रोखावे, असे आवाहन अब्बास यांनी केले. तर ‘अरब लीग’ने सदर विधेयक पॅलेस्टाईनच्या भूभागावरील इस्रायलचा ताबा अधिक बळकट करणारा असल्याचा दावा केला.

तर युरोपिय महासंघानेही इस्रायलच्या या विधेयकावर टीका करून इस्रायलने पॅलेस्टिनींच्या अधिकारांचा आदर करावा, असे आवाहन केले आहे. याबाबत इस्रायलशी चर्चा करणार असल्याचे महासंघाने जाहीर केले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info