वॉशिंग्टन – ‘इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी अमेरिकेला कधीही धमकावण्याची चूक करू नये. असे केले तर इतिहासात कुणीही अनुभवले नसतील असे अभूतपूर्व परिणाम इराणला भोगावे लागतील’, असा सज्जड इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. त्याचबरोबर ‘आत्ताची अमेरिका हिंसाचार आणि संघर्षाबाबतच्या इराणच्या खुळचट धमक्या सहन करणार नाही. तेव्हा इराणने अधिक सावध रहावे’, अशी सूचना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली.
काही तासांपूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अमेरिकेला इशारा दिला होता. यामध्ये इराणबरोबरचे युद्ध अमेरिकेसाठी सर्व युद्धांची जननी असेल, असा दावा रोहानी यांनी केला होता. त्याचबरोबर अमेरिकेची अवहेलना उंदराशी करून इराणला आव्हान दिल्यास अमेरिकेला पश्चाताप करावा लागेल, असेही रोहानी म्हणाले होते. रोहानी यांच्या या इशार्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला भविष्यातील परिणामांची जाणीव करून दिली.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी देखील इराणच्या नेतृत्वावर हल्ला चढविला. इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आणि इराणच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेते आयातुल्लाह खामेनी हे ढोंगी पुरूष असल्याचा आरोप पॉम्पिओ यांनी केला. इराणमधील जनतेमध्ये कट्टरपंथी विचारधारा पसरवून आपली खळगी भरण्यात खामेनी यांना स्वारस्य असल्याचा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला.
‘इराणच्या नेतृत्वाकडून आपल्या जनतेवर सुरू असलेल्या अत्याचाराबाबत जग असंवेदनशील बनले आहे. पण इराणच्या राजवटीचे हे अत्याचार सहन करणारी इराणची जनता शांत बसणार्यांपैकी नाही’, असे सांगून पॉम्पिओ यांनी खामेनी यांच्यावर टीका केली. तसेच इराणमधील खामेनी-रोहानी राजवटीविरोधात इराणची जनता बंड पुकारेल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणच्या नेतृत्वाची तुलना ‘माफिया’शी केली.
इराणच्या ‘बसिज फोर्स’च्या वरिष्ठ कमांडरनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची धमकी फेटाळली असून हा मानसिक युद्धतंत्राचा भाग असल्याचा दावा केला.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियाचा वापर केला. याआधीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियाद्वारे इराणला धमकावले होते. तसेच आपल्या वाक्यातील काही ठरावीक अक्षरं मोठी केली होती. पण रविवारी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना दिलेल्या धमकीतील सर्व मजकूर मोठ्या अक्षरात लिहिला होता. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला दिलेली धमकी अतिशय गंभीर असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.
To Iranian President Rouhani: NEVER, EVER THREATEN THE UNITED STATES AGAIN OR YOU WILL SUFFER CONSEQUENCES THE LIKES OF WHICH FEW THROUGHOUT HISTORY HAVE EVER SUFFERED BEFORE. WE ARE NO LONGER A COUNTRY THAT WILL STAND FOR YOUR DEMENTED WORDS OF VIOLENCE & DEATH. BE CAUTIOUS!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) July 23, 2018
Click below to express your thoughts and views on this news:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |