दोनशे अब्ज डॉलर्सच्या चिनी आयातीवरील कर वाढवून अमेरिका चीनच्या विरोधातील व्यापारयुद्ध तीव्र करणार

दोनशे अब्ज डॉलर्सच्या चिनी आयातीवरील कर वाढवून अमेरिका चीनच्या विरोधातील व्यापारयुद्ध तीव्र करणार

वॉशिंग्टन – चीनबरोेबर पेटलेल्या व्यापारयुद्धातून माघार न घेता अमेरिकेने हे युद्ध अधिकच तीव्र करण्याची तयारी केली आहे. २०० अब्ज डॉलर्सच्या चीनच्या आयातीवर तब्बल २५ टक्के कर लादण्याचा निर्णय अमेरिका लवकरच जाहीर करणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हवाल्याने माध्यमांनी याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. या निर्णयाचा जबरदस्त फटका चीनला बसणार असून चीनच्या अर्थव्यवस्थेवरचा ताण यामुळे अधिकच वाढणार आहे.

चिनी आयात, व्यापारयुद्ध, अमेरिकन शेतकरी, चीन, प्रत्युत्तर, वॉशिंग्टन, अर्थतज्ज्ञ डेव्हिड ब्राऊनगेल्याच आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन अमेरिकन शेतकर्‍यांना लक्ष्य करीत असल्याचे सांगून त्यावर नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प यांचे टीकाकार देखील त्यांच्य चीनविरोधी धोरणामुळे अमेरिकन शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत आहेत. याला उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या या डावपेचांवर हल्ला चढविला व त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल, असे संकेत दिले होते. २०१७ साली चीनने अमेरिकेबरोबरील व्यापारात तब्बल ५१७ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती, याचीही आठवण ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यातील आपल्या सोशल मीडियावरून करून दिली होती.

यानंतर आता ट्रम्प प्रशासनाने चीनच्या तब्बल २०० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकेत होणार्‍या निर्यातीवर २५ टक्के इतका आयातकर लादण्याची तयारी केली आहे. लवकरच याची घोषणा होऊ शकते. आधीच ट्रम्प प्रशासनाने चीनच्या तब्बल २०० अब्ज डॉलर्सच्या आयातीवर १० टक्के इतका आयातकर लादला होता. तर ३४ अब्ज डॉलर्सच्या चिनी उत्पादनांच्या आयातीवर ट्रम्प प्रशासनाने २५ टक्के आयातकर लावला होता. याची व्याप्ती वाढवून २०० अब्ज डॉलर्सच्या चिनी आयातीला लक्ष्य करून ट्रम्प प्रशासन चीनच्या अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धक्का देणार असल्याचे दिसते.

अमेरिका व चीनमध्ये सध्या व्यापारयुद्ध सुरू आहे. या व्यापारयुद्धात अमेरिकेची सरशी होत असून चीनच्या अर्थव्यवस्थेवर आलेला ताण हेच दाखवून देत असल्याचा दावा अर्थतज्ज्ञ करू लागले आहेत. वरकरणी चीन कितीही मोठे दावे करीत असला तरी या चीनचे राज्यकर्ते अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे हवालदिल झाल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. अर्थतज्ज्ञ डेव्हिड ब्राऊन यांनी या व्यापारयुद्धात अमेरिका जिंकत असल्याचा दावा केला होता.

चीनची अर्थव्यवस्था निर्यातप्रधान असून निर्यातीवर परिणाम झाला तर त्याचा झटका चीनला बसल्यावाचून राहणार नाही, असा तर्क ब्राऊन यांनी मांडला आहे. त्यामुळे चीनबरोबरील या युद्धात अमेरिकन भांडवलदारांचे नुकसान होणार असले, तरी अमेरिकन अर्थव्यवस्थेला याचा मोठा लाभ मिळू शकतो. याचा दाखला देऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकन आजवर चीनने द्विपक्षीय व्यापारात अमेरिकेला लुबाडल्याची बाब अमेरिकन जनतेच्या लक्षात सातत्याने आणून देत आहेत.

अमेरिकेने चिनी उत्पादनांवरील आयातकर वाढविल्यानंतर, चीनकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. याचीही तयारी ट्रम्प प्रशासनाने आधीपासूनच केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सध्या तरी अमेरिका व चीनमध्ये पेटलेल्या व्यापारयुद्धाचा शेवट होण्याची शक्यता नसून यामुळे उभय देशांचे संबंध विकोपाला जाण्याची शक्यता अधिक प्रमाणात बळावत आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info