होर्मुझच्या आखाताची कोंडी करण्यासाठी इराणच्या नौदलाचा भव्य युद्धसराव – अमेरिकी अधिकार्‍यांचा आरोप

होर्मुझच्या आखाताची कोंडी करण्यासाठी इराणच्या नौदलाचा भव्य युद्धसराव – अमेरिकी अधिकार्‍यांचा आरोप

वॉशिंग्टन – येत्या ४८ तासात इराणच्या नौदलाची १०० हून अधिक जहाजे युद्धसरावात सहभागी होणार आहेत. पर्शियन आखातात होणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव ठरेल. या जहाजांसह इराण ‘स्वार्म टॅक्टिक्स’चा वापर करून होर्मूझचे आखात बंद करण्याचा सराव करणार आहे. अमेरिकेबरोबर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, इराणने या युद्धसरावाचे आयोजन करून अमेरिका तसेच अमेरिकेच्या मित्रदेशांना इशारा दिल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पर्शियन तसेच होर्मूझच्या आखातातील इराणच्या युद्धसरावाची संख्या वाढली आहे. इराणच्या या युद्धसरावांच्या यादीत गस्तीनौका आणि गनबोट्सच्या युद्धसरावांचाही समावेश होत आहे. अमेरिकी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात इराण पर्शियन आखातात १०० हून अधिक जहाजांचा ताफा उतरविणार आहे. इराणच्या या युद्धसरावाला ‘स्वार्म ड्रिल’ असे म्हटले जाते आणि दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांच्या कालावधीत इराणकडून या युद्धसरावाचे आयोजन केले जाते.

पण यावर्षी इराणने लवकरच ‘स्वार्म ड्रिल’चे आयोजन केल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. तसेच या सरावात इराणच्या वेगवान गनबोट्स आणि गस्तीनौका होर्मूझचे आखात बंद करण्याचा सराव करणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले. इराणच्या सरकारने किंवा लष्कराने याबाबत बोलण्याचे टाळले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून इराणचे नेतृत्व तसेच लष्करी अधिकारी होर्मूझचे आखात बंद करण्याची धमकी देत आहेत.

इराणबरोबरचे युद्ध अमेरिकेसाठी सर्व युद्धांची जननी ठरेल, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी आदेश दिले तर होर्मूझचे आखात बंद करू, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या अधिकार्‍यांनी दिली होती. जगातील एकूण इंधन निर्यातीच्या २० टक्के निर्यात होर्मूझच्या आखातातून केली जाते. हा सागरीमार्ग बंद झाला तर त्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनदरावर होईल.

दरम्यान, याआधी इराणच्या वेगवान गस्तीनौका तसेच गनबोट्सनी पर्शियन आखातातील अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिकांच्या दिशेने धोकादायकरित्या प्रवास केल्याचा तसेच हल्ल्याची चिथावणी दिल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर, इराणने पर्शियन आखातात आयोजित केलेल्या युद्धसरावाकडे गांभीर्याने पाहिले जाते.

इराणच्या युद्धसरावावर अमेरिकेची करडी नजर

‘गेल्या काही आठवड्यांमध्ये अरबी समुद्र, होर्मूझचे आखात आणि ओमानचे आखात या क्षेत्रात इराणने आयोजित केलेल्या युद्धसरावांची संख्या वाढली आहे. इराणच्या या प्रत्येक युद्धसरावावर अमेरिका नजर ठेवून आहे. अमेरिका आपल्या मित्रदेशांच्या सहकार्याने सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित तर आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील व्यापारी वाहतूक सुरक्षित ठेवेल’, अशी घोषणा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन विल्यम अर्बन यांनी केली.

पर्शियन आखातातून होणार्‍या इंधनाच्या वाहतुकीला इराणकडून धोका नसल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. पण इराणने आयोजित केलेला युद्धसराव आणि गेल्या काही दिवसांपासून इराणकडून येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर, आखातातील अमेरिकेचे ‘सेंट्रल कमांड’ तसेच पर्शियन आखातात तैनात अमेरिकेचे पाचवे आरमार सर्व शक्यतांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे कॅप्टन अर्बन म्हणाले.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला खडसावले होते. इराणने अमेरिकेला धमकावण्याची चूक करू नये. असे केले तर इतिहासात कुणीही अनुभवले नसतील असे भीषण परिणाम इराणला भोगावे लागतील, असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता.

English   मराठी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info