मॉस्को/तबलिसी – स्थैर्य व सुरक्षेसाठी हेलिकॉप्टर्स व रणगाडे नाही तर रचनात्मक चर्चा सहाय्यक ठरते, अशा शब्दात रशियाने जॉर्जियात सुरू असणार्या अमेरिका व नाटोच्या युद्धसरावावर तीव्र आक्षेप नोंदविला. जॉर्जियात १ ऑगस्टपासून ‘नोबल पार्टनर २०१८’ हा भव्य युद्धसराव सुरू झाला असून त्यात जॉर्जिया व अमेरिकेसह १३ देशांचे तीन हजारांहून अधिक सैनिक सहभागी झाले आहेत. जॉर्जियातील रशिया समर्थक विघटनवादी प्रांत म्हणून ओळखण्यात येणार्या ‘साऊथ ऑसेटिया’नजिक हा सराव सुरू असून क्षेत्रीय सुरक्षेसाठी सरावाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जॉर्जियाने दिली आहे.
गेल्याच महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी नाटोला फटकारले होते. रशियाचे शेजारी देश असलेल्या युक्रेन व जॉर्जियामध्ये विस्तारवादाच्या नाटोच्या प्रयत्नांना रशिया विरोध करेल, असे पुतिन यांनी बजावले होते. त्यानंतर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, रशियन नेतृत्त्वाला अमेरिका व पाश्चात्य देशांच्या रशियाविरोधी कारवायांची पूर्ण कल्पना असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जॉर्जियात आयोजित अमेरिका व नाटोचे भव्य सराव रशियाला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
१ ते १५ ऑगस्ट असे तब्बल दोन आठवडे सुरू असणारा हा सराव ‘वझिआनी एअरफिल्ड’ व ‘कॅम्प नोरिओ ट्रेनिंग एरिआ’ या क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. यात जॉर्जियाच्या १,३०० सैनिकांसह अमेरिकेच्या तब्बल १,१७० सैनिक सहभागी झाले आहेत. तर ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इस्टोनिया, लिथुआनिया, पोलंड, नॉर्वे, तुर्की, आर्मेनिआ, अझरबैजान व युक्रेनच्या ५००हून अधिक सैनिकांचाही समावेश आहे.
अमेरिकेच्या ‘ब्लॅकहॉक’ व ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्ससह ‘ब्रॅडले फायटिंग व्हेईकल’ व ‘अब्राम्स’ रणगाड्यांचा सरावात सहभाग आहे. ‘नोबल पार्टनर’ युद्धसरावाचे हे चौथे वर्ष असून पुढील महिन्यात नाटोकडून ‘एजाईल स्पिरिट’ हा सराव देखील आयोजित करण्यात आला आहे.
नाटोच्या या सरावांवर रशियाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून हे सराव रशियावर दबाव टाकण्याच्या योजनेचा भाग असल्याचे बजावले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |